लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गरीब जनतेसाठी मोफत धान्य योजना जाहीर केली होती. मात्र, जळगाव जिल्ह्यात अजून या योजनेचा लाभ मिळालेला नाही. गरिबांना मोफत धान्य हे मे महिन्यात मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला अजूनही या योजनेतून धान्य मिळण्याची प्रतीक्षाच आहे.
राज्यात कडक निर्बंध लागू करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गरीब जनतेसाठी सोयी सवलती जाहीर केल्या होत्या. त्यानुसार गरिबांना अंत्योदय योजनेत प्रती रेशन कार्ड ३५ किलो आणि प्रायोरिटी हाऊसहोल्ड कार्डधारकांना प्रती व्यक्ती पाच किलो धान्य मोफत देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, एप्रिल महिना उलटला. लॉकडाऊनच्या निर्बंधांची मुदत संपण्यावर आली आहे. तरी देखील या मोफत धान्याचे वितरण करण्यात आलेले नाही. आता एप्रिलऐवजी मे महिन्यात या धान्याचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला या योजनेचा लाभ मे महिन्यात मिळेल. मे महिन्यात जनतेकडून स्वस्त दरात दिल्या जाणाऱ्या धान्याच्या मोबदल्यात पैसे घेतले जाणार नाहीत.
............
या महिन्यात स्वस्त धान्य योजनेचा लाभ अजून मिळालेला नाही. रेशन दुकानात देखील त्याबद्दल विचारणा केली. मात्र, अजून या योजनेचा लाभ पुढील महिन्यात मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. या अडचणीच्या काळातही मोफत धान्य मिळालेला नाही. - अनिल सोनवणे, लाभार्थी, जळगाव.
गेल्या दोन महिन्यांपासून रोजगारावर कुऱ्हाड आली आहे. सरकारने एप्रिल महिन्यात मोफत धान्य देण्याचे जाहीर केले होते. मात्र, अजूनही हे मोफत धान्य मिळालेले नाही. आम्ही मोफत धान्य मिळण्याची वाट पाहत आहोत. - कैलास पाटील, लाभार्थी, जळगाव.
............
सरकारने जाहीर केलेले धान्य हे मे महिन्यात मिळणार आहे. मे महिन्यात रेशनकार्ड धारकांना मिळणाऱ्या धान्याचे पैसे त्यांना द्यावे लागणार नाही. हे धान्य त्यांना मोफत असेल. त्यात अंत्योदय योजनेत कुटुंबाला ३५ किलो पीएचएच कार्ड धारकांना प्रती व्यक्ती पाच किलो धान्य मिळणार आहे.
- सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी
आकडेवारी
एकूण रेशन कार्डधारक - १०,०६,६१३
पीएचएच - ४,७०,७९५०
अंत्योदय- १,३७,७४९
केशरी ३,२३,०११