लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने २८ ते ३० मार्च दरम्यान तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासन पुन्हा लॉकडाऊनचा विचार करत असून, आता हा लॉकडाऊन व्यापाराच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर शहरातील व्यापार काही प्रमाणात वाढू लागला होता. मात्र पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याने बाजारपेठेत मंदीचे संकट निर्माण होऊन मजुरांवर उपासमारीचे पुन्हा नवीन संकट उभे ठाकले आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तब्बल दोन महिने शहरातील सर्व व्यापारी संकुलं बंद होती. यासह चित्रपटगृह, हॉटेल व रेस्टॉरंट्स, रिक्षा सर्व आस्थापने बंद असल्याने या आस्थापनांवर किंवा शहरातील व्यापारी संकुलांमधील दुकानांमध्ये काम करणाऱ्या मजुरांवर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले होते. जून २०२० नंतर शहरातील व्यापारी संकुल उघडण्यात आली तसेच सर्व आस्थापने पूर्वपदावर येत होती. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करत आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी इतर बाबींची पूर्तता करून, आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करून कोरोना नियंत्रण आणावा अशी मागणी शहरातील व्यापार्यांकडून होत आहे. लॉकडाऊन आता आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य नागरिकांना व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांनादेखील परवडणारा नाही. यामुळे लॉकडाऊन जाहीर न करता इतर पर्यायांवर प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी फुले मार्केट असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
गावांमध्ये जाऊन भाजीपाल्याची करावी लागते विक्री
तीन दिवस जिल्ह्यात लाॅकडाऊन असल्याने, कोणत्याही ठिकाणी आठवडी बाजार व नियमित बाजारदेखील बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात लॉकडाऊन असला तरी शेतीत भाजीपाला हा नियमित पिकत आहे. मात्र भाजीपाला विक्रीवर बंदी असल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच खराब होत आहे. शहरात भाजीपाला विक्री करताना आढळल्यास महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आपला माल गावागावांमध्ये जाऊन विक्री करत आहेत, तर शेतकऱ्यांचा माल घेऊन शहरात भाजीपाला विक्री करणाऱ्या हॉकर्सदेखील व्यवसाय पूर्णपणे ठप्प असल्याने. हातावर पोट असलेल्या हॉकर्सवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे.
रिक्षाही बंद असल्याने दररोजची आवकही संपली
शहरात सुमारे दोन हजारांहून अधिक रिक्षा चालक आपले पोट भरत असतात. मात्र तीन दिवसांपासून रिक्षा बंद असल्याने रिक्षाचालकांचा व्यवसाय ही पूर्णपणे ठप्प आहे. गेल्या वर्षीदेखील तब्बल महिनाभर रिक्षा बंद असल्याने बरेच रिक्षाचालक आपल्या मूळ गावी परतले होते, तर इतर रिक्षाचालकांनी दुसरे व्यवसाय सुरू केले होते. काही महिन्यांपासून परिस्थिती पूर्ववत होत असताना कोरोनाने पुन्हा डोकेवर काढल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय निवडला असल्याने रिक्षा व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोट..
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट असल्याने रिक्षा पूर्णपणे बंद आहेत. ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान परिस्थिती पुन्हा सुधारत होती मात्र आता पुन्हा कोरोना वाढल्याने प्रशासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. यामुळे आम्हाला पुन्हा व्यवसाय बंद ठेवावे लागत आहे. दररोज व्यवसाय झाला तरच संध्याकाळी जेवणाची व्यवस्था होत असते. मात्र जर व्यवसाय ठप्प असेल तर व्यवस्थित जेवणाची व्यवस्था कशी करावी हा प्रश्न आहे.
- छोटू पाटील, खोटे नगर रिक्षा स्टॉप
अनेक महिने लॉकडाऊन मुळे दुकाने बंद ठेवावी लागली होती. दुकाने बंद ठेवली तर दुकानांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत असते. मोठे व्यापारी काही प्रमाणात नुकसान सहन करू शकतात, मात्र दुकानात काम करून दररोज मिळणाऱ्या रकमेतून कुटुंबाचे पोट भरणाऱ्या मजुरांना लॉकडाऊनचे संकट परवडणारे नाही.
- रमेश मतानी, व्यापारी, फुले मार्केट असोसिएशन
लॉकडाऊन मुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दिवसाला ३० किलो भाजीपाला विक्री केल्यानंतर आमच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था होत असते. मात्र जर एखाद्या दिवशी ही भाजीपाला विक्री केला नाही किंवा झाला नाही. तर दोन दिवसांतच आमच्या पुढे आर्थिक संकट निर्माण होत असते. आता प्रशासनाने काही दिवस लॉकडाऊन जाहीर केला तर पुन्हा आमच्या आर्थिक संकट उभे राहील.
- सुरेश सपकाळे, भाजीपाला विक्रेता