चाळीसगाव : शेतीच्या मशागतीची कामे कितीही आधुनिक यंत्राद्वारे करायची म्हटली तरी, गुरांशिवाय पर्याय नाही. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी गुरांची जोड मदतगार ठरते. कोरोनामुळे गुरांचा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ऐन खरिपाच्या तोंडावर बाजाराला टाळे असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्ह्यात निर्बंध शिथिल होत असल्याने गुरांचा बाजारही अनलाॅक करावा, अशी मागणी पुढे आली आहे.
चाळीसगावी दर शनिवारी भरणारा पशुधन बाजार उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. विशेष शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्यातूनही येथे गुरे विक्रीसाठी येतात. गुरे खरेदीसाठी परजिल्ह्यातील शेतकरी, व्यापारीदेखील येथे हजेरी लावतात. यामुळे या बाजारातून दर आठवड्याला मोठी उलाढाल होऊन तालुक्याच्या आर्थिक चक्रालाही गती मिळते. मात्र, २७ फेब्रुवारीपासून कोरोना महामारीमुळे गुरांच्या बाजाराचीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये टाळेबंदी केली गेली आहे. सोमवारपासून टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाले असून, गुरांचा बाजारही सुरू करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
.............
चौकट
शेतकऱ्यांची मोठी गैरसोय
खरीप हंगामात मशागतीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने गुरे खरेदी आणि विक्री करतात. त्यामुळे एप्रिल, मे आणि जून महिन्यात मोठ्या संख्येने पशुधन बाजारात येते. यावर्षी कोरोनामुळे याला ब्रेक लागला असून, शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
१...गुरांच्या बाजारातून दरमहा दोन कोटी रुपयांची उलाढाल होते. प्रत्येक बाजारात ५० लाख रुपयांची गुरांची खरेदी-विक्री होते.
२...पशुधन बाजारातून बाजार समितीच्या गंजाजळीत दरमहा दीड ते दोन लाख रुपये जमा होतात.
३...गेल्या चार महिन्यांपासून बाजार बंद असल्याने सर्वच उलाढाल ठप्प असून, बाजार समितीचेही सहा ते आठ लाखांचे नुकसान झाले आहे.
..........
चौकट
ऊसतोड मजूरही मेटाकुटीला
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपल्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऊसतोडीसाठी गेलेले मजूर आपापल्या गावी परत येतात. हे ऊसतोड मजूरही एप्रिल व मे महिन्यात गुरे खरेदी - विक्रीसाठी बाजारात येतात. तालुक्यात या मजुरांची संख्या ५० ते ६० हजार आहे. या मजुरांच्या गुरे खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. यंदा मात्र कोरोनामुळे हे सर्व थांबल्याने ऊसतोड मजूरही मेटाकुटीला आले आहेत.
......
इनफो
शेतकरी, ऊसतोड मजुरांची होणारी गैरसोय आणि गुरांचा बाजार सुरू करण्यासाठी वेळोवेळी होणारी मागणी लक्षात घेऊन याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे बाजार सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर बाजार सुरू केला जाईल.
-सतीश पाटील
प्र. सचिव, चाळीसगाव कृषी बाजार समिती