जळगाव : राज्यात ३० जानेवारीपर्यंत लॉकडाऊन कायम असल्याने त्यासाठी पूर्वीचेच नियम आजही लागू आहेत. अपवाद वगळता किरकोळ नियमांना सूट दिली आहे. जिल्ह्यात वाइन शॉप रात्री १० पर्यंत, तर बीअर बार ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी राज्य उत्पादन शुल्क व जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ही वेळ निश्चित केलेली असली तरी ती फक्त कागदावरच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आलेले आहे.
जिल्ह्यात ५२९ बीअर बार असून त्यापैकी ५६ बार बंद आहेत. बीअर शॉपीची संख्या २३३ असून त्यातील ५९ शॉपी बंद आहेत. देशी मद्य विक्रीचे १५४ दुकाने जिल्ह्यात आहेत. देशी मद्याचे दुकान सकाळी ८ वाजता सुरू होण्यासह रात्री १० वाजता बंद करणे अपेक्षित आहे.
काही काही बारमालक रात्री ११ वाजले की शटर बंद करतात; परंतु आतमध्ये व्यवसाय सुरूच असतो, असेही काही ठिकाणी आढळून आले. बारच्या बाहेर पार्किंग केलेल्या वाहनांवरून ग्राहकांची संख्या लक्षात येते. या प्रकाराकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कानाडोळा होत असल्याचेही प्रकर्षाने जाणवले. बऱ्याच वेळा रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन सुरू असल्याने वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. दोन महिन्यांपूर्वी तर खुनाच्या घटना शहरात घडल्या. या घटना मद्याच्या नशेतच झालेल्या आहेत तर काही अंडापावच्या हातगाड्यांवर झालेल्या आहेत. वाइन शॉप मात्र वेळेत बंद होत असल्याचे दिसून आले.