जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यासोबत वाढत गेलेल्या लॉकडाऊन, जनता कर्फ्यूमुळे उद्योग, व्यापारासमोर चिंताही वाढतच असून सुवर्णनगरीतील सुवर्ण व्यवसायाला तब्बल चारशे ते पाचशे कोटी रुपयांचा फटका बसला. तसेच लॉकडाऊन दरम्यान विविध सण, लग्नसराई गेल्याने इतरही व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसला असून औद्योगिक उत्पादनही अद्याप ५० टक्क्यांवर असल्याचे सांगण्यात येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारने सातत्याने लॉकडाऊन जाहीर केले. तसेच त्यानंतर स्थानिक पातळीवरील कडक लॉकडाऊन व जनता कर्फ्यू यामुळे उद्योग, व्यापार बंद ठेवावे लागल्याने सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले. याचा जळगावातील प्रसिद्ध सुवर्ण व्यवसाय, चटई उद्योग यांना फटका बसण्यासह इतरही सर्वच व्यवसाय व उद्योगांना मोठा फटका बसला आहे. शिवाय जीवनावश्यक वस्तू म्हणून जे उद्योग सुरू आहे, त्यांच्यापुढेही मजूर, वाहतुकदारांचा प्रश्न असल्याने त्यांच्याही उत्पादनावर परिणाम झाला आहे.या सर्वांमुळे आधीच संकाटत असलेल्या जळगावच्या उद्योगांना मोठा फटका सहन करावा लागला. तसेच दिवाळीच्या काळात अधिक पावसामुळे सुवर्ण व्यवसाय, कापड व इतर व्यवसायांना मोठा फटका बसल्याने ऐन लग्नसराईच्या काळात पुन्हा कोरोनाचे संकट ओढावल्याने शहरातील व्यापारपेठ संकटातून बाहेर पडू शकली नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.सामाजिक बांधिलकी जपत दिली साथकोरोनाने पान टपरी, चहा विक्रेत्यांपासून मोठे उद्योग, व्यापारास वेढीस धरल्याचे चित्र असून सर्वच जण चिंतीत झाले. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करून कोरोनाला नियंत्रणात आणू व सर्व व्यवहार लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी सर्वांचा हातभार महत्त्वाचे असल्याचे सांगत सर्वांनी लॉकडाऊनचे पालन केले. मात्र आता व्यवहार पूर्ववत होत नसल्याने अधिकच चिंता वाढत आहे.सुवर्णनगरीला चारशे ते पाचशे कोटींचा फटकाजळगावातील सोने प्रसिद्ध असल्याने येथे बाराही महिने खरेदीसाठी गर्दी असते. त्यात लग्नसराईमध्ये तर सुवर्णपेढ्यांमध्ये पाय ठेवायला जागा नसते. मात्र यंदाच्या ऐन लग्नसराईमध्येच ही दुकाने बंद राहिली. त्यात जिह्याच्या सीमाही बंद असल्याने सर्व मालाची आवकही बंद आहे. त्यामुळे या काळात सुवर्णनगरीतील सोने-चांदीचा किमान चारशे ते पाचशे कोटींचा व्यवसाय यंदा बुडाला.दुकानांमध्ये माल पडूनशहरात कापड, इलेक्ट्रॉनिक्स मालाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. त्यामुळे यंदा दरवर्षाप्रमाणे सण, लग्नसराईमुळे व्यावसायिकांनी माल भरून ठेवला. मात्र या काळात गुढीपाडवा, अक्षयतृतीय, रमजान ईद या सारखे सण तसेच लग्नसराईचा काळ गेला. त्यामुळे दुकाने बंद राहिली व व्यवसाय ठप्प होऊन कोट्यवधींचा माल पडून आहे. त्यात बहुतांश व्यापार हा व्यापारी संकुलामध्ये असल्याने तेदेखील सुरू होत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून तेथील व्यापारी चिंतीत आहेत. आता ५ आॅगस्टपासून हे संकूल सुरू होणार असले तरी त्यातही काही अटीशर्थी असल्याने त्याचीही चिंता राहणार आहे.उत्पादन ५० टक्के घटकोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन दरम्यान उद्योग, कारखानेदेखील बंद राहिले. त्यानंतर आता ते सुरू झाले असले तरी सध्या उत्पादन ५० टक्क्यांवर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधींचे नुकसान झाले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी उद्योग, कारखाने बंद करण्यात आले आहेत. यात राज्यात हा निर्णय होण्यापूर्वीच जळगाव जिल्हा प्रशासनाने २० मार्च रोजीच औद्योगिक वसाहतीमध्ये ५० टक्के कर्मचारी करण्याचा व त्यानंतर २२ मार्च रोजी उद्योग, कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जवळपास महिनाभर येथील उद्योगांची धडधड थांबली.जळगावात छोटे-मोठे जवळपास १४०० उद्योग असून यात बहुतांश उद्योग हे प्लॅस्टिक प्रक्रिया अर्थात पाईप, चटई उद्योग आहेत. त्यामुळे हा उद्योग मोठमोठ्या मशनरींपेक्षा मजुरांवरच जास्त अवलंबून (लेबर बेस) आहे. त्यामुळे येथे जवळपास ४ ते ५ हजार मजूर कामाला असून यात ५० टक्के मजूर हे परप्रांतीय आहेत. त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान बहुतांश मजूर गावी परतले. लॉकडाऊननंतरही ते पूर्ण परतणार की नाही, याची चिंता उद्योजकांना आहे.नियमांचे पालन करीत व्यवहार सुरू होणे गरजेचेगैरप्रकार टाळण्यासाठी सर्वच व्यवहार सुरू होणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काळात चोरी व इतर प्रकार वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी सर्वच व्यावसायिकांनी तसेच ग्राहकांनी नियमांचे पालन करीत व्यवहार सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावे व प्रशासनानेही नियमांचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन व्यापारी संघटनांनी केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेले उद्योग आता सुरू झाले असले तरी अद्यापही उत्पादन सरासरी ५० टक्क्यांवरच आहे. उद्योग बंद राहिल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली.- सचिन चोरडिया, सचिव, जळगाव इंडस्ट्री असोसिएश (जिंदा), जळगाव.लॉकडाऊन, जनता कर्फ्यू यामुळे जळगावातील व्यापार ठप्प झाला. आता सर्व व्यवसाय सुरू करण्यात परवानगी द्यावी. आता व्यवसाय सुरू झाले तर किमान दिवाळीपर्यंत तरी व्यावसायिक सावरू शकतील.- ललित बरडिया, सचिव, जिल्हा व्यापारी महामंडळ.लॉकडाऊनमुळे सुरुवातीला सुवर्णपेढ्या बंद राहिल्याने या काळात जळगावातील किमान चारशे ते पाचशे कोटींचा व्यवसाय ठप्प झाला. लग्नसराई व इतर सणवार गेल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली होती. आता व्यवहार सुरळीत होत असले तरी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन, जळगाव.
लॉकडाऊन, जनता कर्फ्यूसोबत चिंताही वाढत गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 12:22 PM