लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाउनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्याने उद्योग, व्यापारासमोर चिंताही वाढली आहे. असे असले तरी सध्या सर्वांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याने सर्वांनी घरातच राहणे योग्य असल्याचा सूरही उमटत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारने आणखी २१ दिवस देशभर लॉकडाउन जाहीर केले. यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व उद्योग, व्यापार बंद असल्याने सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. याचा जळगावातील प्रसिद्ध सुवर्ण व्यवसाय, चटई उद्योग यांना फटका बसण्यासह इतरही सर्वच व्यवसाय व उद्योगांना मोठा फटका बसला आहे. शिवाय जीवनावश्यक वस्तू म्हणून जे उद्योग सुरू आहे त्यांच्यापुढेही मजूर, वाहतुकदारांचा प्रश्न असल्याने त्यांच्याही उत्पादनावर परिणाम झाला आहे. या सर्वांमुळे आधीच संकाटत असलेल्या जळगावच्या उद्योगांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. तसेच दिवाळीच्या काळात अधिक पावसामुळे सुवर्ण व्यवसाय, कापड व इतर व्यवसायांना मोठा फटका बसल्याने ऐन लग्नसराईच्या काळात पुन्हा कोरोनाचे संकट ओढावल्याने शहरातील व्यापारपेठ संकटातून बाहेर पडते की नाही, असे चिन्हे निर्माण झाले असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. त्यात आता १४ एप्रिल रोजी लॉकडाउनचा कालावधी संपून व्यवहार सुरू होतील, त्यामुळे त्या तयारीत असतानाच आता पुन्हा लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने उद्योजक, व्यापाºयांची चिंंता वाढली आहे. कोरोनाने पान टपरी, चहा विक्रेत्यांपासून मोठे उद्योग, व्यापारास वेढीस धरल्याचे चित्र असून सर्वच जण चिंतीत झाले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाउनचे पालन करून कोरोनाला नियंत्रणात आणू व सर्व व्यवहार लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी सर्वांचा हातभार महत्त्वाचे असल्याचा सूर उमटत आहे.
सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे आज सर्वच उद्योग, व्यापारासमोर चिंतेचे ढग असले तरी सध्या नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता मोठा आर्थिक फटका सर्वांना सहन करावा लागत असला तरी सर्वांनी एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात येत आहे.