लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दीड वर्षात बंद असलेले शाळेचे द्वार उघडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. या निर्णयाचे शहर व तालुक्यातील शिक्षक व पालकांनी स्वागत केले आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळेच्या प्रवाहापासून दूर जाण्याची भीती होती. ती दूर होईल, शिवाय त्यांच्या मानसिकता अधिक खुलण्यास यातून वाव मिळेल, असे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले आहे.
पेन सुटला, वाचन कमी
लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. मात्र, या शिक्षणात अनेक मर्यादा असतात शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येत नाही. विद्यार्थी व शिक्षकांमधील संवाद कमी झाला असून, शिवाय दीड वर्षापासून पेनाशी विद्यार्थ्यांचे नाते तुटल्यासारखे आहे. यातून गुणवत्तेवर परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळे शाळा जितक्या लवकर उघडतील तितके विद्यार्थ्यांसाठी चांगले, असेही मत शिक्षक व पालक वर्गातून व्यक्त झाले आहे.
पालकांना काय वाटते...
शासनाचा शाळा सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असताना शाळा सुरू करायला हरकत नाही. मुलांच्या मानसिक व गुणवत्ता वाढीसाठी शाळेत जाऊनच शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे. मात्र, यात काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वांची जबाबदारी वाढणार आहे.
-शिवराज पाटील, आव्हाणे
शासनाच्या निर्णयाचे स्वागतच आहे. आज २ वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी लवकरात लवकर शाळा उघडणे हे अनिवार्य झाले होते; परंतु अजूनही कोरोना संकटाचे सावट आपल्या डोक्यावरून गेलेले नाही. म्हणून शाळेने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे. एक पालक म्हणून आम्हीसुद्धा विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन शाळेत पाठवू.
-दीपाली भालेराव, पालक
शिक्षकांना काय वाटते...
ग्रामीण भागात सद्य:स्थितीत ८ ते १० वीचे वर्ग सुरू आहेत. ज्या गावात कोरोना रुग्णसंख्या कमी आहे त्या ठिकाणी पाचवीपासून शाळा सुरू करण्यास हरकत नाही. शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. ऑनलाइन क्लासेसमुळे त्यांच्या हातातून पेन सुटला आहे. याचा गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शाळा सुरू होणे गरजेचे आहे.
-एस.एस. बारी, पर्यवेक्षक, बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली
शाळा उघडण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. ऑनलाइनच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येत नाही. जवळपास ४० टक्के विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शाळा उघडणे गरजचे आहेत. मात्र, त्याचबरोबर शासनाने सॅनिटायझर, थर्मल गन, अशा वस्तूंसाठी शाळांना अनुदान उपलब्ध करून द्यावे. शिवाय शिक्षक व विद्यार्थ्यांचेही पूर्ण लसीकरण होणे गरजेचे आहे.
-नारायण वाघ, जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती संघटना