लोकमत न्यूज नेटवर्कवरखेडी ता.पाचोरा : वरखेडी गावात तब्बल महिनाभरापासून पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत झाली आहे. ग्रामस्थासह महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. दोन दिवसांपासून ग्रामपंचायत कायार्लायाजवळील हातपंप देखील नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकत नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा यंत्रणेच्या माध्यमातून महिला व ग्रामस्थ रोज पाण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त महिलांनी गुरुवार १९ रोजी आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत थेट ग्राम पंचायत कार्यालयास कुलूप ठोकले.
बिल्दी धरणक्षेत्रात वरखेडी ग्राम पंचायतीची सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी विहिर आहे. त्यात पाणी नसल्याने दुसऱ्याच्या विहिरीतून पाणी उपसले जात आहे. यात सुध्दा वीजपुरवठा संदर्भात अडचणी येत आहेत. तसेच अंतर जास्त व वीजपंप कमी अश्वशक्तीचे असल्याने पाणी जाण्यास वेळ लागत असतो. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी रात्ररात्र जागून ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहेत. शेतीच्या वीजपुरवठ्याचे भारनियमन अडथळा ठरत आहे.- सिमा धनराज पाटील, सरपंच, वरखेडी