जळगाव - जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उन्मेष पाटील आणि राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्यात प्रमुख लढत असून रावेर मतदारसंघात भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे विरूद्ध कॉंग्रेसचे डॉ.उल्हास पाटील अशी रंगत आहे. खानदेशमधील या दोन्ही मतदारसंघात जवळपास भाजपचा विजय निश्चित झाला आहे. रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांनी तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेतले आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजपाच्या रक्षा खडसे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून 4 वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालात विसाव्या फेरीनंतर त्यांनी 569821 मते घेतली आहेत. तर, कॉग्रेसच्या डॉ.उल्हास पाटील यांना 286613 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात तिसर्या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे नितिन कांडेलकर राहिले आहेत. रक्षा खडसे या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आहेत.
रावेर लोकसभा मतदार संघात पुरुष मतदार 9,23,627, स्त्री 8,49,451, इतर 29 असे एकूण 17,73,107 मतदार आहेत. त्यापैकी मतदान केलेले पुरुष मतदार 5,83,427, स्त्री 5,05,262, इतर 1 असे एकूण 10,88,690 मतदारांनी मतदानाचा हक्क बजविला. त्यानुसार या मतदार संघात मतदानाची टक्केवारी पुरुष 63.17 टक्के, स्त्री 59.48 टक्के, इतर 3.45 टक्के अशी एकूण 61.40 टक्के इतकी आहे.