जळगाव : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगाव येथून लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना झाले. यामध्ये जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील १२०० जणांचा सहभाग असून जळगाव जिल्ह्यातील ७०० जण यामध्ये आहेत. रवाना होण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय ते रेल्वेस्थानकापर्यंत रॅली काढण्यात आली. या वेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यामुळे परिसर दणाणला होता.
शनिवार, १६ जानेवारी रोजी जळगाव येथून जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी असे एकूण १२०० महिला, पुरुष दिल्लीकडे रेल्वेने रवाना झाले. दुपारी १२ वाजता गोवा एक्सप्रेसने काही शेतकरी रवाना झाल्यानंतर रात्रीपर्यंत वेगवेगळ्या सहा रेल्वेंनी हे शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले. या सोबतच काही जणांचे रावेर, भुसावळ येथून आरक्षण असल्याने तेथूनही काही जण रवाना झाले.
केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणा
दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी लोकसंघर्ष मोर्चा, संयुक्त किसान मोर्चा, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा, मणियार बिरादरी, छावा मराठा युवा महासंघ या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र आले. तेथून जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅली दरम्यान नरेंद्र मोदी किसान विरोधी, जय जवान जय किसान, शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करा, अशा वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या.
मोर्चामध्ये महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, संजय महाजन, मणियार बिरादरीचे फारुक शेख, छावा मराठा युवा महासंघाचे अमोल कोल्हे, प्रा. प्रीतीलाल पवार, हरिचंद्र सोनवणे, भरत कर्डीले, ताराचंद बारेला, कृष्णा सपकाळे, शेख ईस्माईल यांच्यासह शेकडो शेतकरीदेखील सहभागी झाले होते.