जळगाव : ग.स. सोसायटी निवडणुकीत या वेळी नवीन उमेदवारांना संधी देत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यात येईल, असा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत लोकमान्य गटाने घेतला आहे. यात स्वत:हून कोणी आले तर युती करू, अशीही चर्चा या वेळी झाला.
ग.स. सोसायटीच्या १४ संचालकांनी राजीनामे दिले व त्यानंतर सर्वच गटांकडून वेगवेगळ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे सहकार गट प्रशासक नियुक्तीची मागणी करीत आहे तर प्रगती गटाने अध्यक्ष मनोज पाटील यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. यात आता लोकमान्य गटही आखाड्यात उतरला आहे. सोसायटीच्या संचालक मंडळाला कोरोनामुळे मुदतवाढ भेटली असली तरी त्यानंतर होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दृष्टीनेही हालचाली सुरू झाल्या आहेत. यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी लोकमान्य गटाची बैठक झाली.
स्वत:हून कोणी आल्यास दरवाजे खुले
लोकमान्य गट अगोदरपासूनच स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असून याही वेळी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. संस्थेतील स्थिती पाहता स्वत:हून जर कोणी पुढे आले तर युती करू व जे येतील त्यांच्यासाठी दरवाजे खुले राहणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
आयाराम-गयाराम संस्कृतीला आळा बसावा
संस्थेची निवडणूक आली की संचालकांचे इकडून तिकडे जाणे, राजीनामे देणे असे प्रकार सुरूच असतात. आयाराम-गयाराम संस्कृतीला आळा बसणे गरजेचे असून या संस्कृतीला लोकमान्य गटाचा विरोध असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. आयाराम-गयारामांना या वेळी सभासद घरी बसवतील, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला. लोकमान्य गटाच्यावतीने नवीन उमेदवारांना संधी दिली जाणार असून त्यासाठी संभाव्य उमेदवारही ठरविले असल्याचे गटनेते मगन पाटील यांनी सांगितले.
सहा वर्षांपासून संगनमताने कारभार
संस्थेत राजीनामा दिला गेला असला तरी या पूर्वीही वेगवेगळ्या अध्यक्षांविरोधात बंड पुकारले गेले. मात्र सर्वांनीच संगनमताने कारभार करीत नोकरभरती केली व त्यातही स्वत:चे मुले, पत्नी यांना लावून घेण्यात आल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या काळात कोट्यवधींची कमाई केली गेली व काही प्रकारांमध्ये दोन पैसे मिळाले नाही म्हणून बंड पुकारले गेले असा आरोपही या वेळी करण्यात आला. गैरमार्गाने सत्ता मिळविली व ती टिकत नसल्याचे लोकमान्य गटाचे म्हणणे आहे.
या वेळी लोकमान्य गटाचे अध्यक्ष गंजीधर पाटील, गटनेते मगन पाटील, साहेबराव पाटील, शरद भगवान पाटील, प्रतिभा सुर्वे, विलास पाटील, वाल्मीक पाटील, गुणवंत पाटील, अमित पाटील, सुधाकर सूर्यवंशी यांच्यासह तालुका पातळीवरील कार्यकर्ते उपस्थित होते.