जळगाव : ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरात सुध्दा आता पाणी टंचाईची समस्या उद्भवण्यास सुरूवात झाली आहे़ अनेकांना घरे सुध्द नाहीत, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते, मात्र तेही गुणवत्ता पुर्ण नाही़ त्यामुळे रस्ते, पाणी, घरकुल आणि शैक्षणिक सुविधांवर जादा भर देणे महत्वाचे आहे आणि या सुविधा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत जळगाव परिसरातील प्रवाशांनी व्यक्त केले.शहरातील नवीन बसस्थानक ते ममुराबाद या दहा कि़मी़ अंतराच्या रिक्षा प्रवासातून प्रवाश्यांचे मत जाणून घेण्यात आले़ यावेळी शाहुनगरातील इम्रान शेख यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत कुठलाही पक्ष निवडून येवो, मात्र त्यांनी शहराचा खरोखर विकास केला पाहिजे़ आजही शहरामधील तरूणांना नोकरीसाठी बाहेरी गावी जावे लागते़ तर ममुराबाद येथील दिलीप पाटील यांनी सांगितले की, पक्ष पाहूनच मतदान करणार आहे. मात्र, निवडून आलेल्या उमेदवाराने नागरिकांसाठी पाण्याची सुविधा, घरकुलाची सुविधा तसेच सार्वजनिक शौचालय, शैक्षणिक सुविधांवर अधिक भर देऊन ती कामे केली पाहिजे़ पाणी टंचाईची समस्या नेहमीच गावात उद्भवते, यासाठी खरोखर प्रयत्न व्हायला हवे़ अन्यथा आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या पक्षाला मतदान न करण्याचेही त्यांनी सांगितले़ योगेश बारी याने रोजगाराची समस्या मांडली. एमआयडीसी आहे मात्र मोठे उद्योग नाहीत, त्यामुळे हातमजुरी करावी लागते, असे सांगितले.आश्वासने नको़़़शहरातील बहुतांश भागात तसेच ममुराबाद भागात पाणी टंचाईची समस्या आहे़ सध्या रस्त्यांचीही दैनावस्था झाली असून पायी चालणे देखील मुश्किल झालेले आहे़ एकप्रकारे शहराचे विद्रुपीकरण केले आहे़ त्यामुळे शहरातील रस्तेआधी होणे गरजेचे आहे़ निवडणुकीपुरतेच आश्वासन देणे बंद करावे, निवडून दिल्यावर सुविधा जनतेपर्यंत पोहचवाव्या असेही मत प्रवाश्यांनी व्यक्त केले.
लोकमत आॅन द व्हील्स : रस्ते, पाणी, घरकुल सुविधांवर भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:13 PM