सुरेश विसपुते
धुळे : सध्या बेरोजगारी वाढली आहे. परंतु त्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही. डी.एड., बी.एड. पदवीधारक तरुण एमआयडीसीत काम करताहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रम केलेल्या तरुणांना येथून स्थलांतर करावे लागते. त्यांना येथेच शाश्वत रोजगार उपलब्ध मिळावा, अशी अपेक्षा हेरंब देवरे या तरुणाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे ते शिंदखेडा एसटी बसप्रवासात ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्याच्याशी संवाद साधला. येथे मोठे उद्योग आणण्यासाठी कधी प्रयत्न झाले नाही. आताही वेळ गेली नसल्याचे तो म्हणाला. तर कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र पिकाला दीडपट भाव मिळाला नाही, अशी व्यथा शेतकरी नथ्थू पवारांनी व्यक्त केली. जवळ असूनही शेतीसाठी तापी नदीच्या पाण्याचा उपयोग होत नाही. कोणताच प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नसल्याचा अनुभव विदारक आहे. आम्ही नोकरीसाठी गुजरातमध्ये गेलो. परंतु एवढ्या वर्षातही स्थितीत बदल झालेला नाही. जिल्ह्यात उद्योग आले तर नोकऱ्या मिळतील, असे भिका चव्हाण यांनी सांगितले. ‘मेट्रो’पेक्षा शेतीकडे लक्ष द्या या सरकारने केवळ नोकऱ्या दिल्या नाही. परंतु इतर कामे केली. मात्र मेट्रो रेल्वेचे त्रांगडे नको होते. त्यापेक्षा शेतीच्या प्रश्नात हात घालायला हवा. कोरडवाहू शेती परवडत नाही. ठिबक सिंचनावरील सबसिडी ५० वरून ८० टक्के करा, अशी अपेक्षा होळ येथील रमेश पाटील यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जगात देशाची प्रतिमा उजळली.सध्या पर्याय नसल्याने त्यांना अजून एक संधी निश्चित मिळेल, असे रमेश धुर्मेकर यांनी सांगितले.