धरणगाव : येथील पी.आर. हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक व ‘लोकमत’चे धरणगाव तालुका प्रतिनिधी शरदकुमार रामलाल बन्सी (४८) यांचे कोरोनाशी लढतांना शनिवार २६ रोजी दु. १.३० वाजता निधन झाले. २९ सप्टेंबर पासून ते जळगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी संघर्ष करत होते. मात्र, दुदैर्वाने त्यांचा हा २८ दिवसांचा लढा अपयशी ठरला. एका उमद्या आदर्श शिक्षकाच्या जाण्याने धरणगांवावर शोककळा पसरली आहे.धरणगाव तालुक्यातील दीन, दलित, गरजू विद्यार्थ्यांना सतत मदतीचा हात देणारा कृतिशील शिक्षक म्हणून ते परिचित होते. समाजातील दानशूर व्यक्तीमत्वांकडून मदतनिधी उभारुन गरीब, होतकरु, गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, ड्रेस, बुट, शालेय साहित्य देणे तसेच काही विद्यार्थ्यांची फी देखील ते भरत होते. त्यांच्या जाण्याने गरजू विद्यार्थ्यांचे छत्रच हिरावले गेले आहे.कोरोना काळात सुरवातीपासून त्यांनी प्रबोधन व जनजागृतीत उत्साहाने काम केले होते. बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून पुरस्कार देवून नुकताच प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. ज्या कोरोना विरुध्द त्यांनी जनजागृती केली त्याच कोरोनाने त्यांचेवर क्रूर घाला घातला.या पंचवीस वषार्पासून ते पत्रकार म्हणून कार्यरत होते. जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक, बालाजी वाहन प्रसारक मंडळाचे संचालक, चर्मकार समाजाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून ते कार्यरत होते. शिक्षण, सामाजीक, पत्रकारिता, सहकार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलं असा परीवार आहे.
लोकमतचे वार्ताहर शरदकुमार बन्सी यांचे कोरोनामुळे अकाली निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:18 PM