हरताळा, ता. मुक्ताईनगर : हरताळा फाट्यावरून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई-नागपूर महामार्ग जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील गोसावी बर्डीजवळ असलेल्या व कोथळी, मुक्ताईनगर बायपास रोड असणारा सर्व्हिस रोड ओडीएच्या जुन्या पाईपलाईनमुळे अडथळा ठरत होता. यासंबंधी राष्ट्रीय चौपदरीकरण महामार्गात ओडीए पाईपलाईन ठरते अडथळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये २१ जून रोजी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागाने लागलीच दोन-तीन दिवसात वृत्ताची दखल घेत तत्काळ रस्त्यातील असलेली ओडीएची जुनी पाईपलाईन काढली असून, सर्व्हिस रोडसाठी आता मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांनीदेखील समाधान व्यक्त करीत सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गत वेळेस नवीन पाईपलाईन टाकली होती. मात्र जुन्या पाईपलाईनचा सर्व्हिस रोडसाठी अडथळा ठरत होता. तेथे दिशादर्शक फलक नव्हते. त्यामुळे कोथळी बायपासकडे वळण्यासाठी वाहनचालक गोंधळात पडत होते.
महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी येथे दोन्ही बाजूंनी सुरळीत वाहतूक सुरू असताना येथील गोसावी बर्डीच्या टेकडीजवळ जवळील पायथ्याजवळ अडथळा निर्माण होत होता. जवळच टेकडीच्या बाजूने सर्व्हिस रोड अर्धवट होता. त्यामुळे वाहनधारकांना फिरून वाहन वळवून अडचणीचे होते. रात्रीच्या अंधारामध्ये सर्व्हिस रोड दिसेनासा होता. त्यामुळे अपघात वाढण्याची भीती वाहनधारकांकडून व्यक्त होत होती. असे असताना ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियेसह माहिती घेतली. त्यांनी तत्काळ दखल घेत सर्व्हिस रोडसाठी अडथळा ठरणारी पाईपलाईन काढली व तेथे आता सर्व्हिस रोडसाठी रस्ता करण्यात येत आहे.
ओडीएच्या जुन्या पाईपलाईनचा अडथळा दूर झाला असून, वाहनचालकांची गैरसोय आता दूर होणार असून, सर्व्हिस रोडमुळे समाधान व्यक्त होत आहे.