विहार तेंडुलकर/ आनंद सुरवाडे ।जळगाव : कोरोनाच्या महामारीत सर्व खासगी रुग्णालये सध्या रुग्णसेवेसाठी सुरु असल्याचे वरवर सांगितले जात असले तरी ‘न्यूमोनिया’ रुग्णांना त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला असला तरीही ‘नो एन्ट्री’ असल्याचे धक्कादायक चित्र ‘लोकमत’च्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले आहे.शहरातील महत्वाच्या आणि प्रसिध्द अशा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष जाऊन विचारणा केल्यानंतर हे वास्तव पुढे आले. एवढेच नव्हे तर न्यूमोनिया रुग्ण असेल तर रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेपासूनच त्याला नाकारण्याला सुरुवात होत असल्याचेही दिसून आले. आठपैकी केवळ तीनच रुग्णालयांमध्ये अधिक चौकशी करण्यात आली तसेच रिपोर्ट निगेटीव्ह असेल तर डॉक्टर्संना भेटा मग तेच काय ते निर्णय घेतील, असे थोडे समाधानकारक उत्तर देण्यात आले.शासकीय रुग्णालये कोरोना साथ आटोक्यात आणण्यात गुंतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी खासगी रुग्णालये ही अन्य रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्याचे तसेच कायम सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यावर जवळपास सर्व रुग्णालये सुरु असल्याचे उत्तरही प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र या खासगी रुग्णालयातील काय परिस्थिती आहे, खरोखरच कोरोना नसलेल्या कोणत्याही रुग्णाला त्या रुग्णालयात प्रवेश दिला जातो का? याची चाचपणी घेण्यासाठी ‘लोकमत’ने सोमवारी खासगी आरोग्य व्यवस्थेचे ‘स्टींग आॅपरेशन’ केले. शहरातील काही प्रसिध्द रुग्णालयांमध्ये जाऊन याबाबतची माहिती घेण्यात आली असता वरीलप्रमाणे जळजळीत वास्तव पुढे आले.अनेक रुग्णांना याआधी असे अनुभव आले होते. एका महिलेला आठ रुग्णालय फिरूनही दाखल केले नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घातले होते, तरीही अशा रुग्णांची फरफट थांबलेली नाही.अत्यावश्यक सेवा शाहू महाराज रुग्णालयातही बंदहा अनुभव आहे महानगरपालिकेच्या शाहू महाराज रुग्णालयातील! याठिकाणी चौकशी केली असता दुपारी २ वाजेपर्यंत येथे रुग्ण तपासणी होते, त्यानंतर केवळ डिलिव्हरीचे पेशंट घेतले जातात़ अन्य इमर्जन्सी सेवा बंदच असल्याचे सांगण्यात आले़ उद्या सकाळी रिपोर्ट आणा मगच डॉक्टर सांगतील, ‘अॅडमिट करायचे की नाही?’ मनपाच्या रुग्णालयातही अशा रुग्णांना सध्या प्रवेश नसल्याचे चित्र दिसून आले.६ रुग्णालये ५ अनुभव1) आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या जिल्हा पेठेतील एका बड्या हॉस्पिटलमध्ये अगदी सिक्युरिटीपासूनच नकारघंटा सुरु झाली. तरीही प्रतिनिधीने चौकशी कक्षापर्यंत जाऊन चौकशी केली. त्यावेळी न्यूमोनियाचा रुग्ण दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला़ अहवाल निगेटीव्ह असला तरी घेणार नाही, असे सांगण्यात आले़ मात्र पुन:पुन्हा प्रश्न विचारल्यावर तुम्ही रुग्ण आणण्याआधी अहवाल आणा बाहेरून एक रस्ता आहे़ तिथे डॉक्टरांना दाखवा मग तेच ठरवतील़ पण शक्यतो पेशंट घेणार नाही, असे उत्तर मिळाले़2)ओंकारनगरातील एक क्रिटिकल केअर तर थेट रुग्ण सापडला म्हणून बंदच असल्याचे सांगण्यात आले़3)ओंकार नगरातीलच अजून एका हॉस्पीटलमध्ये तर थेट झिडकारण्यात आले़ चौकशी करण्यास आलेल्या माणसाला जणू काही असाध्य अन् महागंभीर संसर्गजन्य आजार झाल्यासारखी वागणूक देण्यात आली. जरा दूर सरका, बाजूला व्हा, असे सांगत एकाने तेथूनच झिडकारायला सुरुवात केली. मात्र काही वेळाने चौकशी कक्षात चौकशी केली असता त्याठिकाणी असलेल्या एका महिला कर्मचाºयाने नाही, तसा पेशंट तपासणीला पण आणू शकत नाही. आधी नोंद करा आणि मग ते रिपोर्ट आणा, असे सांगून पत्ता कट करण्यात आला़4)कांताई सभागृहानजीक एका रुग्णालयात विचारणा केली असता, डॉक्टरांना भेटून घ्या, ते सांगतील काय ते? असे थोडे समाधानकारक उत्तर मिळाले़5)आकाशवाणी चौकातील एका हॉस्पीटलमध्ये ‘डॉक्टर नाहीत, संध्याकाळी या’, असे उत्तर मिळाले़ मात्र व्हेंटीलेटरसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी तातडीने डॉक्टरांना फोन लावून माहिती विचारली व ‘नाही’, असे सांगितले़ रिपोर्ट असतील तर सांगता येईल, असे उत्तर या ठिकाणी मिळाले़लॉकडाऊन असताना काय अवस्था होईल?लॉकडाऊन नसताना जर असे भयानक चित्र असेल तर मंगळवारपासून लॉकडाऊन झाल्यानंतर एखादा गंभीर रुग्णाची काय अवस्था होईल, याचा विचारही करू शकत नाही. कारण एखादा गंभीर रुग्ण असेल तर लॉकडाऊन नसताना त्याला आणण्यासाठी एखादे वाहन सापडेल, लॉकडाऊनच्या काळात या रुग्णाला सुरुवातीला रुग्णवाहिका शोधावी लागणार अन् नंतर रुग्णालय शोधण्यासाठी फिराफिर. कारण न्युमोनिया असलेल्या रुग्णांना अनेक रुग्णालयात ‘नो एन्ट्री’च असल्याचे दिसून येत आहे.योजनेच्या रुग्णालयानेच असे केले, मग..?रुग्णालयांमध्ये पाहणी केल्यानंतर काही ठिकाणी तर झिडकारत ‘नाही, नाही, असा रुग्ण आम्ही घेत नाही’, असे उत्तर मिळाले़ विशेष म्हणजे आरोग्य योजनेअंतर्गत ज्याठिकाणी रुग्णावर मोफत उपचार होतात, त्याच रुग्णालयाकडूनही असे उत्तर मिळते. अन्य रुग्णालयात जरी गरीब रुग्णाची व्यवस्था झाली तरी त्याचे होणारे अव्वाच्या सव्वा बिल भरणार कुठून? हा प्रश्न गरिबांसमोर उभा राहिल.शासकीय यंत्रणा धावली नाहीतर..न्यूमोनिया, श्वसनाला त्रास होणे असे आजार असतील, मग जरी तुम्ही कोरोना निगेटीव्ह असलात तरी शासकीय व्यवस्था झाली तर ठिक अन्यथा उपचारांअभावी तडफडतच रुग्णाला रहावे लागेल, प्रसंगी...’ असे चित्र सध्या जळगावात उभे राहिले आहे.लोकमतने विचारले हे प्रश्न अन् असे उत्तर..-प्रश्न : रुग्णाला आणायचे होते आणता येईल का ?-उत्तर : कशासाठी?-प्रश्न : श्वास घ्यायला त्रास होतोय व न्यूमोनिया आहे दाखल कराल काय?-उत्तर : नाही. असे रुग्ण आता घेत नाहीत-प्रश्न : पण कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आहे.-उत्तर : तरीपण नाही़ आधी रिपोर्ट आणा मगच ठरवू़़़पण तरीही घेणार नाहीत.-प्रश्न : बाहेर कुठे घेतील का?-उत्तर : सांगता येत नाही़़़तुम्ही रिपोर्ट आणा
लोकमत स्टिंग : न्यूमोनिया असला तरी खासगी रुग्णालयात ‘नो एंट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 12:08 PM