रमाकांत पाटीलनंदुरबार : तापी नदीवरील बॅरेजेस बांधून १० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला; पण त्याचे पाणी शेतापर्यंत पोहोचले नाही. प्रत्येक निवडणूक आली का सर्वच पक्षवाले आम्ही बॅरेज बांधले, आम्ही बॅरेज बांधले करून गाजावाजा करतात, पण त्याचा कुठलाही फायदा नाही. या निवडणुकीत जर राजकीय पक्षांनी त्याचा ढिंडोरा पिटला तर अशांना मतच देणार नाहीत... अशी संतप्त प्रतिक्रिया नंदुरबार-शहादा दरम्यान प्रवास करणाऱ्या शेतकरी प्रवाशांनी व्यक्त केली.नंदुरबार ते शहादा हे ४० किलोमीटरचे अंतर.... प्रवाशांच्या निवडणुकीसंदर्भातील प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता विविध प्रश्नांवर अतिशय संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. या बसमध्ये विशेषत: अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी व शेतकरी असेच प्रवासी होते. प्रवास जसजसा पुढे सरकू लागला तसतसे प्रश्न समोर येत गेले आणि स्वाभाविकच त्याबाबतची चिड प्रवाशांमध्ये व्यक्त होत गेली. समशेरपूर गावाजवळ पूर्वीचा पुष्पदंतेश्वर कारखाना येताच हिरूभाई पाटील व काशिनाथ पाटील यांनी उसाचा प्रश्न मांडून यंदा उसाला भाव मिळाला नसल्याचे सांगितले. त्याला सरकारी धोरण जबाबदार असल्याचे ते सांगत होते. त्यांचा हा विषय पूर्ण होत नाही तोच तापी नदीवरून बस पुढे सरकत असताना काही शेतकरी प्रवाशांनी प्रकाशा बॅरेजकडे बोट दाखवित सांगितले, तो पहा तो प्रकल्प अनेक वर्षांपासून पूर्ण झाला आहे. पण उपसा योजना करण्याबाबत केवळ आश्वासन दिले जाते. गेल्या १० वर्षात जेवढ्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार त्याचे श्रेय घेतात. पण उपसा योजना कोणी केल्या नाहीत. ज्यांचे सरकार येते ते आश्वासन देतात. पण अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. केवळ आश्वासने ऐकून आता चिड यायला लागली आहे. त्यामुळे यावेळी जर कोणी बॅरेजचे श्रेय घेतले तर त्याला मतेच देणार नाही, असा सूर या प्रवाशांनी व्यक्त केला.प्रवास झाला अर्धा तास लांबडामरखेडा ते शहादा दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रवास खडतर व संथ झाला. त्यावर विद्यार्थ्यांनी प्रश्न करीत आमचा प्रवास या रस्त्यामुळे अर्ध्या तासाने वाढला. त्यामुळे कॉलेजला आम्हाला एरवीपेक्षा एक तास आधी जावे लागते.
लोकमत आॅन द व्हील्सलोकमत आॅन द व्हील्स : बॅरेजचे श्रेय घेणाऱ्यांना मत देऊ नका....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:57 PM