लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एखाद्याचे रक्तदान हे दुसऱ्याचा जीव वाचवू शकते, रक्ताचा एक-एक थेंब दुसऱ्याच्या जीवासाठी आवश्यक ठरू शकतो. कोविडच्या महामारीत निर्माण झालेली परिस्थिती व आगामी काळात रक्ताची वाढणारी मागणी लक्षात घेता, रक्ताची ही गरज भागविण्यासाठी आता लोकमतला साथ देत मोठे महाअभियान राबविण्याचा निर्धार विविध सामाजिक संस्थांनी मंगळवारी आयोजित चर्चासत्रात केला.
मंगळवारी दुपारी बारा वाजता 'लोकमत' च्या शहर कार्यालयात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी 'लोकमत' चे कार्यकारी संपादक रवी टाले यांनी रक्तदान मोहिमेविषयी सविस्तर माहिती दिली. 'लोकमत’चे संस्थापक संपादक स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त २ ते १५ जुलै दरम्यान ‘लोकमत’ रक्ताचे नाते हे अभियान राबविले जात आहे. त्यात व्यापक प्रमाणात रक्तदान शिबिर घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लोकमतच्या या सामजिक दायित्वाला हातभार लावण्यासाठी शहरातील उपस्थित संस्थांच्या पदाधिकार्यांनी पुढाकार घेण्याचा मनोदय व्यक्त केला. सर्व संस्थांनी या चर्चासत्रात अतिशय उत्साहाने व समाजासाठी काहीतरी करायचे आहे, या उदात्त हेतूने भाग घेतला.
यांनी घेतला चर्चेच सहभाग
तुळजाई बहुद्देशीय संस्थेचे भूषण लाडवंजारी, क्षितीज फाउंडेशनचे गजानन वंजारी, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे दीपक दाभाडे, जनमत प्रतिष्ठानचे पंकज नाले, ब्राह्मण सोशल फाउंडेशनचे हेमंत वैद्य, जिल्हा ॲथेलेटिक्स संघटनेचे राजेश जाधव, मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनचे फिरोज शेख, जेसीआय डायमंड सिटीचे जिनल जैन, जळगाव अर्बन सेल अध्यक्ष अश्विनी देशमुख, पवन चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ.विलास नारखेडे, शहर बॉक्सिंग असोसिएशनचे नीलेश बाविस्कर, युवाशक्ती फाउंडेशनचे प्रीतम शिंदे, साई मोरया ग्रुपचे उमाकांत जाधव, प्रशांत पाटील, स्नेह फाउंडेशनचे रवींद्र नेरपगारे, नाभिक महामंडळाचे संजय सोनवणे, सर्वश्री चिंतामणी फाउंडेशनच्या रुपाली वाघ, तुळजाई बहुद्देशीय संस्थेचे विकास वाघ, अजय मकरे यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला.