जळगाव : वर्षभर ज्या रामरायाचे व रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक, माहेरवाशिणींना ओढ लागलेली असते ती ओढ १४८ वर्षांच्या परंपरेत यंदा प्रथमच ऑनलाइन दर्शनावर थांबली. ज्या कोरोनामुळे आठ महिने देऊळ बंद राहिले ती देवळे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या वहनोत्सवाच्या एक दिवस अगोदरच खुली झाली. मात्र यात्रा, मिरवणुका बंद असल्याने यंदा रथोत्सवाची ग्रामप्रदक्षिणा थांबली व भाविकही रथाच्या स्वागत, पूजेपासून वंचित राहिले. परंपरेत खंड पडू नये यासाठी हा लोकोत्सव केवळ पाच पावलांचा झाला व नारळाचे तोरण वाहण्यासाठी असणारी लगबग यंदा थांबून रथोत्सवालाच मर्यादेचेच तोरण बांधले गेले.
ब्रह्मवृंदांकडून होणारा वेदमंत्रांचा घोष, रांगोळ्यांनी सजलेला परिसर, रथावर होणारी पुष्पवृष्टी, ‘राम, लक्ष्मण...जानकी...जय बोला हनुमान की’चा जयघोष, आरती देण्यासाठी असणारी महिला वर्गाची लगबग, रथाला नारळाचे तोरण वाहणे, दिंड्यांचा गजर, तुतारी अशा संगीतमय व मंगलमय धार्मिक वातावरण असणारा ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचा रथोत्सव म्हणजे लोकोत्सवच असतो. मात्र यंदा या लोकोत्सवाला मोठ्या मर्यादा आल्या.
दरवर्षी कार्तिकी एकादशीला निघणाऱ्या ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या श्रीराम रथोत्सवाला १४८ वर्षांची परंपरा लाभली आहे. गेल्या वर्षापर्यंत ग्रामप्रदक्षिणेसह हा उत्सव अखंडित साजरा झाला. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग उद्भवला व सर्वच व्यवहारांसह धार्मिक उत्सवही बंद झाले. यामध्ये रथोत्सवालाही मर्यादा आल्या.
ऑनलाइन दर्शन
कोरोनामुळे यंदा रथोत्सवात मिरवणूक न काढता साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे भाविकांना रथोत्सवाचे ऑनलाइन दर्शन घ्यावे लागले. रथाची मिरवणूक न काढता रथाची पूजा करण्यात आली. उपस्थितीला मर्यादा असल्याने इतर भाविकांनी रथोत्सवाच्या ठिकाणी न येता फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाइन दर्शन घेतले.
केवळ पाच पावले निघाला रथ
रथोत्सव म्हणजे सर्वांना याची ओढ लागलेली असते. यात दिवाळी-भाऊबीजसाठी माहेरी आलेल्या माहेरवाशिणीदेखील रथोत्सव झाल्याशिवाय व दर्शनाशिवाय सासरी जात नाहीत. त्यामुळे हा उत्सव एक प्रकारे लोकोत्सवच असतो. दरवर्षी रथ शहरातून विविध भागांतून फिरविला जातो. यात जागोजागी त्याचे स्वागत होते, भाविक दर्शन घेतात. इतकेच नव्हे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणून मुस्लीम बांधवांकडूनही रथाचे स्वागत केले जाते. यंदा या सर्व उत्सवाला बंधने आली व परंपरा टिकून राहण्यासाठी केवळ पाच पावले रथ ओढण्यात आला.
ना दिंड्यांचा गजर, ना पुष्पवृष्टी
रथोत्सवासाठी दरवर्षी संपूर्ण जुने जळगाव परिसरासह रथमार्ग रांगोळ्यांनी सजतो, श्रीराम मंदिरापासून वेगवेगळ्या भागातून रथ जात असताना उंच घरांवरून रथावर पुष्पवृष्टी करण्यात येते, श्रीरामाचा जयघोष होतो, आरती देण्यासाठी महिला वर्गाची लगबग, नारळाचे तोरण रथाला वाहणे, दिंड्यांचा गजर, तुतारी अशा मनमोहक उत्सवाला कोरोनामुळे यंदा मुकावे लागले.