जळगाव- भीमराज की बेटी मै तो जयभीम वाली हू, भीम युगाचं तांबड फुटलं... या देशाचं गिऱ्हाणं फिटलं... यासारख्या अजरामर गीतांमधून उपेक्षित, वंचित समूहाला जागृत करण्याचे काम करणारे लोकशाहीर आणि भीमकुळाचे सच्चे वारसदार प्रतापसिंग बोदडे (६७) यांचे शुक्रवारी दुपारच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मुंबई येथे रेल्वेतून निवृत्त झा्ल्यानंतर ते मुक्ताईनगर या मूळ गावी वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जळगाव येथे आणण्यात आले. दुपारी १२.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
बोदडे हे मित्र परिवारात दादा म्हणून परिचित होते. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. लोककवी वामनदादा कर्डक यांचे पट्टशिष्य असलेले प्रतापसिंग बोदडे यांनी भीमगीतांचे शेकडो कार्यक्रम सादर केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा गायक कुणाल बोदडे आणि तीन मुली, असा परिवार आहे.