-तत्कालिन अवसायक जितेंद्र कंडारे व उद्योजक सुनील झंवर यांना न्यायालयाने फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शरण येण्यासाठी १० मार्च अंतिम तारीख देण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाने पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ११ फेब्रुवारी रोजी शहरात येऊन दोघांच्या घरासह न्यायालयाचे मुख्य प्रवेशद्वार शहर पोलीस स्टेशन व काव्यरत्नावली चौक आदी ठिकाणी नोटीसा डकविल्या होत्या.
-डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल बीएचआरच्या गुन्ह्याचे अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र पुण्याच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. महावीर मानकचंद जैन (वय ३७, शिवशक्ती अपार्टमेंट, शिव कॉलनी), विवेक देवीदास ठाकरे (वय ४५,रा.देवेंद्र नगर), धरम सांखला, कमलाकर भिकाजी कोळी (वय २८,रा.के.सी.पार्क),सुजीत सुभाष बाविस्कर (रा.पिंप्राळा) यांच्याविरुद्ध ६१ कोटी ९० लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा दोषारोपपत्रात उल्लेख आहे.
- शासनाने बीएचआरवर प्रशासक म्हणून २०१५ मध्ये जितेंद्र कंडारे याची नेमणूक केली होती. त्याने अटकेतील आरोपी व इतरांशी संगनमत करून पतसंस्थेच्या मालमत्ता बनावट वेबसाईट तयार करून सुनील झंवर व त्यांच्या फर्मच्या नावे बेकायदेशीरीत्या वर्ग करून पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३० टक्क्याने विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रकमेचा व संस्थेच्या मालमत्तेचा अपहार केला.
- संशयितांची सद्य:स्थिती
सुजीत सुभाष बाविस्कर (४२, रा. सेंट्रल बँक कॉलनी) व विवेक देवीदास ठाकरे (४५, रा. देवेंद्र नगर), धरम किशोर सांखला (४०, रा. शिवकॉलनी), महावीर मानकचंद जैन (वय ३७, रा. गुड्डूराजा नगर), कमलाकर भिकारी कोळी (२८, रा. के.सी. पार्क), सूरज सुनील झंवर (२९, रा. जय नगर) आदी जामिनावर आहेत.
-कायदेशीर सल्लागार प्रकाश जगन्नाथ वाणी (रा. ठाणे) व अनिल रमेशचंद्र पगारिया यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तर जितेंद्र गुलाबराव कंडारे (रा. शिवाजी नगर), सुनील देवकीनंद झंवर (रा. जय नगर), योगेश किशोर साखला (रा. शिव कॉलनी), योगेश रामचंद्र लढ्ढा (रा. पाळधी, ता. धरणगाव) व माहेश्वरी (रा. जळगाव) यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
३ कोटी भरल्यानंतर बड्या कर्जदारांची सुटका
प्रेम नारायण कोगटा (रा.जळगाव), जयश्री अंतिम तोतला, भागवत गणपत भंगाळे (रा. जळगाव), जयश्री शैलेश मणियार, संजय भगवानदास तोतला (सर्व रा. जळगाव, ह.मु. मुंबई), छगन श्यामराव झाल्टे (रा.महुखेडा, ता.जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (रा.जामनेर), राजेश शांतीलाल लोढा (रा. जामनेर), आसिफ मुन्ना तेली (रा.भुसावळ), प्रीतेश चंपालाल जैन (रा. धुळे), जयश्री अंतिम तोतला (रा. मुंबई, मूळ रा. जळगाव) या बड्या कर्जदारांनी २० टक्के प्रमाणे २ कोटी १३ लाख रुपये न्यायालयात भरले, त्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका झाली.
राज्यात ८१ गुन्हे, १२ गुन्ह्यांत दोषारोपपत्र दाखल
बीएचआर अपहार व फसवणूक प्रकरणात चेअरमन व संचालक यांच्याविरुद्ध राज्यातील २२ जिल्ह्यात ८१ गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचे खटले जळगाव न्यायालयात चालविले जाणार आहेत. १२ गुन्ह्यांमधील दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्या.आर.एन. हिवसे यांच्या न्यायालयात दाखल झाले. उर्वरित ६९ गुन्ह्यांचे दोषारोपपत्रदेखील याच न्यायालयात दाखल होणार आहे. या सर्व गुन्ह्यांत जळगावचेच १४ आरोपी आहेत. त्यात संस्थापक चेअरमन प्रमोद रायसोनी याच्यासह, १२ संचालक व एक व्यवस्थापक अशा १४ जणांचा सहभाग आहे. सर्व आरोपी जळगाव कारागृहात आहेत.
९० हजार ठेवीदारांचे ८७१ कोटींची देणी
२०१५ च्या लेखापरीक्षण अहवालानुसार संस्थेचे ९० हजार ठेवीदार असून, त्यांची ८७१ कोटी रुपयांची देणी बाकी आहे. त्याशिवाय २२ हजार कर्जदार असून, त्यांच्याकडून ७२४ कोटी रुपये येणे बाकी असल्याचे नमूद आहे. बीएचआर या संस्थेचा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व छत्तीसगढ या नऊ राज्यांत विस्तार असून, त्याचे मुख्यालय जळगाव आहे.