पाचोरा : वाणेगाव येथील हॉकीपटू रामकृष्ण भास्कर पाटील हा सोनिपत येथे प्रशिक्षणासाठी जाताना बेपत्ता झाल्याने त्याचे आई-वडील चिंताग्रस्त झाले आहे. या घटनेस 21 दिवस उलटूनही तपास न लागल्याने त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यांना अश्रूधारा लागल्या आहेत. मुळातच रामकृष्ण हा मोठय़ा प्रतीक्षेनंतर पाटील कुटुंबात जन्माला आला. भास्कर पाटील यांना विवाहानंतर तब्बल 18 वर्षानी अपत्य झाले. हाच मुलगा रामकृष्ण आता पाटील कुटुंबाचा एकमेव आधार आहे. दुर्दैव असे की, रामकृष्णच्या वडिलांना दोन महिन्यांपूर्वीच लखवा झाला. हलाखीच्या परिस्थितीतही रामकृष्ण हा जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. रामकृष्णने निंभोरी येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले तर पाचोरा येथील गो.से. हायस्कूलमध्ये माध्यमिक, शेंदुर्णी येथील गजाननराव गरुड महाविद्यालयात उच्च माध्यमिकचे शिक्षण पूर्ण केले. नंतर तो जळगावमधील नूतन मराठा महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. हॉकीपटू म्हणून त्याने ओळख निर्माण केली असून राज्यस्तरीय स्पर्धामधून त्याने यश संपादन केले आहे. रामकृष्ण बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. प्राध्यापक, मित्र, नातेवाईक यांनी अनेकदा प्रयत्न करूनही मोबाइलवर संपर्क होऊ शकला नाही. त्याची मोठी बहीण लक्ष्मीने मात्र चार-पाच दिवसांपूर्वी तो फेसबुकवर सक्रिय असल्याचे सांगितले. सोनिपत येथे जाणा:या रामकृष्ण पाटील याच्या बॅगा केरळमध्ये कशा पोहचल्या याबद्दल तर्कवितर्क केले जात आहे. तपास सुरू जळगाव शहर पो.स्टे.चे पीआय प्रदीप ठाकूर यांचेशी संपर्क साधला असता तपास सुरू आहे. त्याचा मोबाईल ट्रेस केला जात असल्याचे सांगितले. रामकृष्णचे वाणेगाव येथील काही मित्र शनिवारी पोलीस स्टेशनला चौकशीसाठी गेले होते. आता रामकृष्ण कोठे असेल याचीच चिंता आप्तेष्टांना लागून आहे.3 जानेवारीपासून संपर्क नाही3 जानेवारी रोजी तो हॉकी प्रशिक्षणासाठी जळगावहून रवाना झाला. त्याचे काही मित्र सचखंड एक्सप्रेसवर निरोप देण्यासाठी गेले होते. नंतर मात्र त्याचा कोणाशीही संपर्क न झाल्याने आई-वडिलांना चिंता वाटली. या दरम्यान त्याची आई सिंधूबाई यांना मोबाईलवर केरळ येथील पल्लाकड स्टेशनहून रेल्वे पोलिसांचा कॉल आला, पण त्यांची भाषा समजली नाही असे आईने दोन दिवसांनी सगळ्यांना सांगितले व रामकृष्णच्या दोन बॅगा स्टेशनवर सापडल्याची माहिती दिली.
बेपत्ता मुलाच्या वाटेकडे लागल्या नजरा
By admin | Published: January 24, 2017 1:20 AM