- स्टार : ७४१
लिंकिंग शेतकऱ्यांची पाठ सोडेना : कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांकडून साठा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शेती उत्पादनासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या रासायनिक खतांना आता चांगलीच मागणी वाढली असून त्याचा गैरफायदा घेत काही ठिकाणी वाढीव दर लावले जात आहेत. काही ठिकाणी खतासोबत इतर वस्तू घेण्याची सक्ती (लिंकिंग) केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरूच असल्याचा प्रकार बळीराजा अनुभवत आहे.
दरवर्षी साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगामाची पेरणी सुरू होते. त्यादृष्टीने शेतकऱ्यांकडून बियाणे, खते, कीटकनाशके यांचे नियोजन केले जाते. यामध्ये मृग नक्षत्रात पेरणी झाल्यानंतर काही दिवसांनी खताची मात्रा द्यावी लागते. त्यात खताची टंचाई असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना दरवर्षीच येतो. त्यामुळे खरीप हंगामापूर्वी खताचेही नियोजन आता केले जात आहे. त्यात केंद्र सरकारने खताच्या किमती भरमसाठ वाढल्याने शेतकरी चिंतित झाला.
त्यानंतर केंद्र सरकारनेच खतांच्या अनुदानात वाढ केली. त्यामुळे रासायनिक खते पूर्वीच्याच किमतीत विक्री करावे असे निर्देश देण्यात आले. याविषयी पाहणी केली असता अनेक केंद्रांवर नव्या वाढीव दराने खतांची विक्री केली जात असल्याचे पहावयास मिळाले. या विषयी शेतकऱ्यांनी देखील जादा दराने खत घेतल्याचे सांगितले.
एकीकडे सरकार व कृषी विभागाने खताच्या सुरळीत पुरवठ्यासाठी नियोजन केले असले तरी अनेक ठिकाणी खत शिल्लक नाही, खतासोबत इतर वस्तू घ्याव्या लागतील असे सांगून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा अनुभव आला.
याविषयी प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक ठिकाणी खतासोबत सुष्म अन्नद्रव्य, ग्रॅनुअल अथवा इतर घटक पदार्थ घ्यावे लागतील असे सांगण्यात आले. काही दुकानांवर तर खत नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. यासोबतच सरकारने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा ज्यादा दर घेतले जात असल्याचा अनुभव देखील आला.
- जिल्ह्याचे एकूण लागवड क्षेत्र - सात लाख ५३ हजार हेक्टर
अशी सुरू आहे लूट
खत विक्री च्या एका केंद्रावर भेट दिली असता त्या ठिकाणी १०:२६:२६ या खताची मागणी केली असता त्यांनी सांगितले यासोबत ग्रॅनुअल घ्यावे लागेल. ते घेण्यास नकार दिला असता त्याशिवाय काहीच मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले. केवळ खताची आवश्यकता असताना इतर वस्तू घ्यावे लागत असल्याने त्यातून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.
दुसर्या एका दुकानावर तपास केला असता खताचा साठा संपला आहे, असे सांगण्यात आले. डीएपी, १५:१५:१५ खत मिळावे यासाठी वाढीव रक्कम देण्यास तयार आहे, असे सांगितले मात्र तरी देखील खत उपलब्ध नसल्याचे सांगून परत पाठविण्यात आले.
एका दुकानावर खता सोबत इतर काही वस्तू घ्यायची सक्ती केली नसली तरी त्या ठिकाणी १०:२६:२६ या खतासाठी १२५० रुपये मोजावे लागतील असे सांगण्यात आले. तसेच डीएपी या खतासाठी १४०० रुपये लागतील असे सांगण्यात आले. मुळात त्यांची किंमत कमी असतानाही वाढीव रक्कम घेऊन शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा अनुभव आला.
सरकारने खतांवर आता अनुदान वाढविले असले तरी भविष्यात दरवाढीची चिंता शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. खत घ्यायचे झाल्यास त्यासोबत इतर वस्तू घेणे अर्थात लिंकिंग सुरू असल्याने हा प्रकार थांबविला पाहिजे.
- किशोर चौधरी, शेतकरी
खत घेण्यासाठी गेले असता अनेक दुकानांवर साठा नसल्याचे सांगण्यात येते तर काही ठिकाणी वाढीव किंमत मागितली जाते. यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.
- अनिल सपकाळे, शेतकरी.
खतांच्या किमती
खतांचे प्रकार -जुने दर -नवे दर- सध्याचे दर
१०:२६:२६-११७५-१७७५-१२५०
२०:२०:०:१३-१०५०-१६००-१०५०
डीएपी-११७५-१९००-१४००
पोटॅश-८५०-१०००-८५०