नेरी, ता. जामनेर : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत अखेर भाजपाचे भगवान पुंजू इंगळे विजयी झाले असून त्यांच्या विरोधारात भाजपचेच मावळते सरपंच रतिलाल भोई यांनी लढत दिली होती. या लढतीत इंगळे हे नऊ - तीन मतांच्या फरकाने विजयी झाले. सदरची निवड प्रक्रिया स्थगित करण्यासाठी भोई यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते मात्र हे अपील फुसकाबार निघाल्याचे स्पष्ट झालेमावळते सरपंच रतिलाल भोई यांची पदावरून गच्छंती झाल्यानंतर रिक्त जागेवर सोमवारी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. तेरा सदस्यांच्या या ग्रामपंचायतीमध्ये बारा- एक असे संख्याबळ आहे. मात्र स्वकीयांनीच पदावरून चलेजावची भूमिका घेतल्याने भोई हे नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी माजी उपसरपंच राजेश बेलदार यांच्या मदतीने या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून काटशह देण्याचा प्रयत्न केला.या निवडणुकीत विरोधी सदस्य यांच्यासह त्यांना फक्त तीन मते मिळाली तर सत्ताधारी गटाच्या बारा सदस्यांपैकी नऊ मते इंगळे यांना मिळाली तर एक जण गैरहजर होतेया निवडणूकीवर स्थगिती आनण्यासाठी रतिलाल भोई यांनी वकिलांमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते परंतु लोकसभा निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे या प्रकरणाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे बेलदार यांनी सांगितले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एस. पवार यांनी काम पहिले.ग्रामविकास अधिकारी पुलकेशी केदार यांनी मदत केली.या निवडीनंतर जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जि. प. सदस्या विद्या खोडपे, पोलीस पाटील कैलास सोनार यांनी नवनिर्वाचित सरपंच भगवान इंगळे यांचे स्वागत केले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
नेरी सरपंचपदी भगवान इंगळे विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 6:51 PM