जळगाव : सत्य, अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास १३ एप्रिलपासून सुरुवात होत असून पाच दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १७ एप्रिल रोजी मुख्य सोहळा होणार असून याच दिवशी महावीर स्वामींची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्यावतीने पाच दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ््यादरम्यान १३ रोजी संध्याकाळी ७ ते १० या वेळेत बालगंधर्व नाट्यगृहात ‘नादविधान’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. संजय मोहड (औरंगाबाद) यांच्यासह १५ जणांचे पथक हा कार्यक्रम सादर करणार आहे.१४ रोजी सकाळी ७ ते रात्री १० असे दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहे. यात प्रथम सकाळी ७ ते ८ या वेळेत आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे सामूहिक सामायिक होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ ते साडे नऊ दरम्यान खान्देश सेंट्रलच्या प्रांगणात ट्रेझर हंट स्पर्धा, होणार असून सकाळी १० वाजता बालगंधर्व नाट्यगृहात ग्रिटिंग कार्ड, स्लोगन, ‘मेरे महावीर’ चारोळी, ३२ आगम कॅलेंडर, माता त्रिशला व भगवान महावीर यांच्या वेशभुषा (फॅन्सी ड्रेस) स्पर्धा होतील. दुपारी दोन वाजता अनुभूती इंग्लिश मीडियम शाळेत (आर.आर. विद्यालयाजवळ) मुलांसाठी ‘भगवान महावीर’ हा अॅनिमेशन चित्रपट दाखविण्यात येणार आहे. संध्याकाळी साडेसात ते आठ या वेळेत बालगंधर्व नाट्यगृहात संगीतमय भक्ती आराधना, रात्री ८ ते १० या वेळेत बालगंधर्व नाट्यगृहात ‘शिखर से शिखर तक’ या विषयावरील धन्ना शालिभद्र ही नाटिका सादर केली जाणार आहे.१५ रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत गणपतीनगरातील रोटरी हॉल येथे तरुण-तरुणींसाठी रायपूर येथील महेंद्र मुकीम यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी साडेचार वाजता शिवतीर्थ मैदानापासून सद््भावना रॅली, संध्याकाळी सात ते साडेसात बालगंधर्व नाट्यगृहात पुरस्कार वितरण, साडे सात ते रात्री १० या वेळेत ‘कहानी : केवली जंबुकुमार’चे सादरीकरण होणार आहे.१६ रोजी सकाळी ९ वाजता पांझरापोळ संस्थान येथे गोमातेस लापसी अर्पण करण्यात येणार आहे. संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत कांताई सभागृहात ‘मै अपने भाग्य का निर्माता’ हा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी ७ ते १० या वेळेत बालगंधर्व नाट्यगृहात भगवान महावीर यांचे सिद्धांत व आजचे विज्ञान या विषयावर ‘भगवान महावीर चरीत्र’ ही नाटिका सादर केली जाणार आहे.ध्वजवंदनाने मुख्य सोहळ््यास सुरुवातभगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचा मुख्य सोहळा १७ रोजी होणार असून सकाळी साडेसात वाजता काँग्रेस भवन समोरील श्री वासूपूज्य जैन मंदिरात ध्वजवंदनाने त्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर याच ठिकाणाहून सकाळी ८ वाजता भव्य शोभायात्रेला (वरघोडा) सुरुवात होणार आहे. बालगंधर्व नाट्यगृहाजवळ शोभायात्रेचा समारोप होऊन त्या ठिकाणी सकाळी १० ते साडे अकरा वाजेदरम्यान मंगलाचरण, स्वागत गीत, सामूहिक ध्वजारोहण, भगवंतास पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन होऊन मार्गदर्शनास सुरुवात होणार आहे. ‘भगवान महावीर मेरे मॅनेजमेंट गुरु’ या विषयावर कोलकत्ता येथील जयश्री डागा या मार्गदर्शन करणार आहेत. माजी मंत्री सुरेशदादा जैन हे या सोहळ््याची अध्यक्षस्थानी राहणार आहे. या सोबतच माजी खासदार ईश्वरलाल जैन, शाकाहार सदाचारचे प्रणेता रतनलाल बाफना, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर रमेशदादा जैन, सकल जैन संघाचे अध्यक्ष दलुभाऊ जैन यांच्यासह सर्व पंथियांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.या ठिकाणी रक्तदान शिबिर, मधुमेह तपासणी करण्यासह देहदानाचे अर्ज स्वीकारले जाणार आहे. सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच या वेळेत गौतमी प्रसादी होणार असून दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत श्री वासूपूज्य जैन मंदिरात पंचकल्याणक पूजा होणार आहे.उपस्थितीचे आवाहन श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे प्रमुख अजय ललवाणी यांच्यासह आयोजक संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास आजपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:36 PM