आॅनलाईन लोकमतदेऊळगाव गुजरी, जि.जळगाव, दि.७ : भरवस्तीत असलेल्या एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणेचारच्या सुमारास घडली. यात लाखो रुपयांचे नुकसान होऊन घर व दुकानांच्या भिंतीची पडझड झाली. स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरल्याने भूकंप झाल्याच्या भीतीने नागरिकांनी पळापळ केली.देऊळगाव गुजरीतील वैजनाथ आप्पा जटाळे यांचा मुलगा संजय वैजनाथ अटाळे याने या जागेच्या दक्षिण बाजूस दुकान व त्या बाजूलाच त्यांचा रहिवास आहे.
बुधवारी पहाटे पावणेचार वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडर मधोमध फाटून तीन भाग झाले. घटनास्थळी जमलेल्या शेकडो ग्रामस्थांनी स्फोटानंतर लागलेली आग विझविण्यात यश मिळविले. परंतु संजय जटाळे यांचे स्टेशनरी जनरल माल शालेय साहित्य व इतर मालमत्ता व शेजारील रहिवासी यांचे स्फोटात लाखो रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच देऊळगावचे तलाठी खोडवे यांनी व फत्तेपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. स्फोटाची तीव्रता लक्षात घेता पहूर पो.स्टे.चे साहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले. सुदैवाने जीवित हानी टळली आहे.भूकंपाची अफवा आणि पळापळस्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती की, जागेवरील टिनपत्रे व शटरच्या चिंधड्या होऊन जागेसमोरील घराची भिंत, जागेचा दर्शनी भाग कोसळून आसपासच्या अनेक घरावरील पत्रे फाटली आहेत. सकाळी चारच्या सुमारास घडलेल्या या स्फोटाने संपूर्ण देऊळगाववासी हादरले व भूकंपाच्या अफवेने सर्वांनी घराबाहेर धाव घेतली.