लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : २००५ मध्ये कॉलेजमध्ये असताना दोघांची ओळख झाली. मैत्रीतून प्रेम फुलले. कुटुंबाच्या विरोधानंतर देखील दोघांनी लग्न केले. वडिलांचा विरोध झुगारून देखील तिने त्याच्यासोबतच संसार थाटला. ही गोष्ट आहे. जळगावच्या तेजस अकोले आणि जयश्री पाटील- अकोले यांची.
२००५ मध्ये अकरावीत शिकत असताना दोघांची ओळख झाली. जळगावच्या नुतन मराठा महाविद्यलयात अकरावीत शिकत असताना मैत्री झाली. याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २००७ मध्ये तेजस ऑडीओलॉजीचे शिक्षण घेण्यासाठी हैदराबादला गेला. त्यावेळी देखील दोघे एकमेकांच्या संपर्कात राहिले. कुटुंबाचा व्यवसाय सांभाळण्यासाठी तेजस जळगावला परतला त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यात मुख्य अडसर होता तो जयश्रीच्या कुटुंबाचा. दोघांची जात वेगळी असल्याने तिचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. त्याच्या भितीने दोघांनी घरी न सांगताच आपले मित्र सचिन, नेहा आणि सागर यांच्या सोबत जाऊन २ डिसेंबर २०१० पद्मालय येथे विवाह केला. त्यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले. काही दिवसांनी तेजस याने त्याच्या कुटुंबाला विवाहाची कल्पना दिली. त्याचवेळी जयश्री हिच्यासाठी कुटुंबाने स्थळे पाहणे सुरू केले. त्यावेळी तेजसने तीला घेऊन गृहप्रवेश केला आणि संसाराला सुरूवात केली. अकोले कुटुंबांने तिला सुन म्हणून स्विकारले मात्र ही बाब तिच्या माहेरी माहिती नव्हती. मात्र त्यांच्या प्रेमाची कल्पना असल्याने तिचे वडील यांनी थेट तेजस याचे घर गाठले. त्यावेळी तेजसच्या वडिलांनी तिच्या माहेरच्यांची समजुत घातली. त्यावेळी ते लग्नाला तयार झाले. त्यानंतर ५ मे २०११ ला पुन्हा त्यांचे थाटामाटात सर्वांच्या साक्षीने लग्न लावून देण्यात आले. आज तेजस कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत आहे. तर त्या दोघांना दोन मुली देखील आहेत.