जळगाव : वकिलीचा सल्ला देता..देता..त्यातूनच नजरानजर झाली..आणि मग त्यातून ओळख व मैत्री...या मैत्रीचे रुपांतर प्रेमात अन् पुढे थेट प्रेमविवाहतच झाले. ही प्रेम कहाणी आहे ॲड सूरज जहांगिर चौधरी आणि नेहा सतीश साळी यांची. ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने प्रेमविवाह केलेले सूरज व नेहा यांनी तरुणाईला प्रेम करा, पण ते निस्सीम असले पाहिजे व दोघांना जबाबदारी, करियर व संसार याचेही भान ठेवावे, असे आवाहन ‘लोकमत’ च्या माध्यमातून केले आहे.
ॲड.सूरज चौधरी यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, आई वडिलांचाही प्रेमविवाह झालेला असल्याने प्रेमविवाहाविषयी घरात वादाचे कारणच नव्हते. न्यायालयीन प्रकरणाच्या निमित्ताने पत्रकार सिताराम साळी यांच्या कुटुंबाशी संबंध आला. त्यामुळे त्यांच्या घरी येणंजाणं वाढले. त्यांची न्यायालयीन केस हाताळत असताना सिताराम साळी यांची नात व सतीश साळी यांची मुलगी नेहा हिच्याशी ओळख झाली. या ओळखीतून नजरानजर होऊन दोघांना प्रेमाची चाहूल लागली. त्यातून प्रेम अधिक बहरले. वर्षभरातच आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याला नेहाच्या घरातून विरोध झाला. लग्न करणार तर सूरजशीच असा ठाम निर्धार करतानाच सूरज उच्च शिक्षित आहे, देखणा आहे. वकिली व्यवसायही चांगला आहे, कुटुंबात पोषक वातावरण देखील आहे. त्याचे आई, वडील स्विकारायला तयार आहेत या बाबी स्वत:च्या कुटुंबात पटवून दिल्या. दोघं परिवाराने पुढाकार घेत, जातीपातीच्या भींती, मर्यादा न ठेवता दोघांच्या सुखाचा विचार केला अन् प्रेमविवाहाला संमती दिली. त्यानुसार दोघं परिवाराच्या साक्षीने २६ डिसेंबर २०१२ रोजी थाटात विवाह पार पाडला.
आठ वर्षापासून सुखाने संसार
आजच्या तरुण पीढीतील अनेक जण ‘व्हॅलेंटाईन डे’ व प्रेम याकडे क्षणिक पाहतात, मात्र हे नाते पवित्र ठेवताना स्वत:चे करिअर, संसार याकडे जबाबदारीने पाहिले पाहिजे. मुलगी आई, वडिलांना सोडून आपल्याशी एकरुप होते हे देखील बघितले पाहिजे, या नात्याला तडा न जावू देता एकोप्याने संसार करुन दोघं कुटुंब आपल्यामुळे तणावात येणार नाही याची काळजी घ्यावी. आमच्या सुखी संसाराला आठ वर्ष झाली, या दिवसात कुठेही मतभेद झाले नाहीत. दोघांनीही स्वत:सह दोघांच्या आई, वडिलांचा मान, सन्मान ठेवत काळजी घेतली. एक आदर्श असे आमचे कुटुंब ठरल्याचे ॲड.सूरज चौधरी म्हणाले.