लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : गावात वॉर्ड तीनसह अन्य बऱ्याच भागात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नळांना दोन बादल्या पाणी येत असताना त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच उपयोग होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
संपूर्ण ममुराबाद गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी लहान व मोठे जलकुंभ उभारण्यात आले आहेत. त्यानुसार वॉर्ड क्रमांक तीन व परिसरासाठी नेहरू विद्यालयाजवळ एक जलकुंभ उभारण्यात आला आहे. प्रत्यक्षात या जलकुंभावरून अपेक्षित दाबानुसार पाणीपुरवठा केला जात नसल्याने नळांना बऱ्याचवेळा पुरेसे पाणी येत नाही. पाणी आले तरी जेमतेम दोन बादल्या भरतील, इतकाच वेळ पाणी येते. दुसरीकडे मात्र धो-धो पाणी वाहते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीसमस्या जास्त तीव्र होत असते. यंदाही तोच प्रत्यय येत असून रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या रहिवाशांनी पाणीटंचाईच्या विषयाला वाचा फोडण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा ग्रामविकास अधिकारी व सरपंचांना तोंडी व लेखी निवेदने दिली आहेत. मात्र, त्यांनी व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्याचे तसेच तापी नदीवरील पंपिंग होत नसल्याचे कारण देऊन नेहमीच वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाणीटंचाईची समस्या कायम असताना या भागातील ग्रामपंचायत सदस्यदेखील पाणीप्रश्न सोडविण्यात आतापर्यंत अपयशी ठरल्याचाही आरोप केला जात आहे.
पाण्याची समस्या तातडीने निकाली न निघाल्यास ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात येईल तसेच पाणीपट्टी कराचा भरणा केला जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
-----------------
पंधराव्या वित्त आयोगाचे काय झाले ?
ग्रामपंचायतीला पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीपैकी निम्मा निधी हा पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी खर्च करण्याची मुभा आहे. मात्र, ममुराबाद येथील अंतर्गत पाइपलाइन बदलण्यासाठी अद्याप काहीच हालचाल होऊ शकलेली नाही. त्यामुळे असमान पाणीवितरण समस्या कायम आहे. रीतसर आराखडा तयार करून सदरचे काम मार्गी लावण्याची मागणी होत आहे.
--------------------
पावसाळा असो किंवा उन्हाळा पाणीटंचाई आमच्या पाचवीला पुजलेली आहे. नळांना नेहमीच जेमतेम बादलीभर पाणी येत असल्याने नाइलाजाने ट्यूबवेलवरील क्षारयुक्त पाणी पिण्यासाठी वापरावे लागते.
- अविनाश पाटील, ग्रामस्थ, ममुराबाद