अजय पाटीलजळगाव : आम्ही शिवसेनेत गेल्या ३५ वर्षांपासून काम करीत आहोत आणि ३२ वर्षांचे आदित्य ठाकरे हे आमच्यावर गद्दार असल्याचा शिक्का मारतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करतात, हे योग्य आहे का ?. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात. मात्र, शिवसेनेच्या विचारांचे वारसदार नाहीत, अशा शब्दात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सध्याच्या शिवसेनेतील घटनाघडामोडींवर मत व्यक्त केले.
‘लोकमत’च्या कार्यालयाला गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सध्याच्या घडामोडींबाबत आपल्या दिलखुलास अंदाजात उत्तरे दिली. आम्ही केलेला उठाव हा केवळ शिवसेनेच्या भल्यासाठी आहे. आमची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत नाराजी नाही. मात्र, ज्यांनी उद्धव ठाकरे यांना घेरले आहे त्यांच्यासोबत आमची नाराजी आहे. शिवसेनेची सद्य:स्थिती ही केवळ खासदार संजय राऊत यांच्यामुळेच निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
आता जेथे आहोत तेथेच ठिक आहोत
३५ वर्षांपासून शिवसेनेत काम करत असल्याने अचानकपणे उठाव करण्याची वेळ आली. तेव्हा तर गणपतीच काय, पिरोबा, म्हसोबादेखील आठवावे लागले. शिवसेना फुटू नये म्हणून आम्हीही प्रयत्न केले. तसेच आम्ही सोडून जाण्याच्या अगोदर उद्धव ठाकरे यांच्याकडे बसून, सर्वांना बोलावून घेण्याचीही विनंती केली. हेच काय तर सर्व उलथा-पालथ होण्याआधी चार महिन्यांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, आमदार नाराज असल्याची कल्पना दिली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया केवळ बघू, करू, अशी होती. या उठावानंतर आता जेथे आहोत त्या ठिकाणी ठिक असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या शिंदे गटाच्या समेटाबाबत त्यांनी स्पष्ट नकार दिला.
राऊतांचे ‘ते’ वाक्य आजही कानात घुमतेएकीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे होत असताना, शिवसेनेच्या आमदारांना मात्र मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यात आमचे मुख्यमंत्री असताना त्यांना वेळ मिळत नसल्याने आमदारांनी आपल्या समस्या मांडाव्या कोणाकडे, अशी समस्या होती. पक्षाचे एक नाही तर ८ मंत्री सोडून गेले, ४० आमदारांनी बंड केले तरीही गांभीर्य वाटले नाही, की त्यांना थांबवावे, आम्ही समजवायला गेलो तर संजय राऊत म्हणाले होते की, ‘दिसतात तर सिंहासारखे मात्र हृदय उंदरासारखे’ हे राऊतांचे वाक्य आजही कानात घुमत असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षप्रमुखच मुख्यमंत्री झाले तर आम्ही रडायचे कुणाकडे
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण आयुष्यात कोणतेही पद घेतले नाही. फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटपात भेदभाव होत होता त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही रडायचो. त्यांनी फडणवीस यांना फोन लावल्यानंतर तत्काळ कामे होत होती. मात्र आता पक्षप्रमुखच मुख्यमंत्री झाले त्यामुळे आता शिवसेनेच्या आमदारांनी रडायचे कुणाकडे हा प्रश्न होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सरकारमध्ये सहभागी झाले आणि संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.