बियाण्यांसाठी दीड हजार अर्जातून ५४० शेतकऱ्यांचे नशीब
१,४६२ जणांनी केला होता अर्ज :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाकडून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार असून, यासाठी जिल्ह्यातील १,४६२ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आपले अर्ज दाखल केले होते. जिल्हा कृषी विभागाकडून नुकतीच या अर्जांची लॉटरी उघडण्यात आली. यामध्ये १,४६२ शेतकऱ्यांपैकी केवळ ५४० शेतकरी पात्र ठरले असल्याची माहिती कृषी विभागाकडे देण्यात आली आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अन्नधान्य पिके व शेतीसंदर्भातील अवजारांची मागणी करण्यासाठी कृषी विभागाकडून महाडीबीटी पोर्टल विकसित करण्यात आले होते. चालू खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाण्यांवर अनुदान देण्याबाबत २४ मेपर्यंत शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेने या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नसला, तरी लॉटरीमध्ये केवळ ५४० शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
कोणत्या तालुक्यात किती ?
जळगाव - ३०
भुसावळ - ३५
यावल - ३०
चोपडा - १००
मुक्ताईनगर - ३५
रावेर - ३५
बोदवड - २५
एरंडोल - ३०
पारोळा - २५
भडगाव - ६०
महागडे बियाणे कसे परवडणार
कृषी विभागाने अनुदानित बियाण्याबाबत कोणतीही जनजागृती केलेली नव्हती. यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. नाईलाजास्तव महागडी बियाणी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहेत.
-जितेंद्र वसंत चौधरी, शेतकरी
महाडीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ हे नेहमी सर्व्हर डाऊन असल्याचे आढळून आले. नोंदणी करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करूनदेखील या ठिकाणी नोंदणी होऊ शकली नाही. याबाबत कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
- मंगेश चौधरी, शेतकरी
बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडचण होत असते. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून शेतकऱ्यांना काहीसा फायदा होऊ शकतो. मात्र, या योजनेबाबत कृषी विभागाने जनजागृती करण्याची गरज आहे.
-भूषण भगवान पाटील, शेतकरी