भाग्यश्री ही नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत १६ वर्षाआतील गटात विजेती ठरली आहे. मात्र त्यामागे आहे, तिची १० ते १२ वर्षांची मेहनत आणि सततचा सराव. भाग्यश्रीचा मोठा भाऊ प्रतीक हादेखील बुद्धिबळाचा राष्ट्रीय खेळाडू आहे. त्याला खेळताना पाहून तीदेखील बुद्धिबळ खेळायला लागली. तेव्हा तिचे वय फक्त तीन वर्षे होते. कमी वयातच एकाग्र होऊन ती पझल्स सोडवत असे. ते पाहून तिचे वडील प्रवीण पाटील यांनी तिला बुद्धिबळ शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर तिने वेगाने प्रगती केली. तिची आईदेखील तासनतास तिला बुद्धिबळाचे बारकावे समजावून सांगत असे आणि तिच्यासोबत बुद्धिबळदेखील खेळत असे. जळगावमधील स्थानिक प्रशिक्षक विवेक दाणी, प्रवीण सोमाणी आणि प्रवीण ठाकरे यांनीही तिला बुद्धिबळाचे धडे दिले. हे सर्वजण तिच्यासोबत बुद्धिबळ खेळत असत. ६ वर्षांची असताना तिने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या सात वर्षाआतील गटाचे जेतेपद पटकावले. त्यानंतर तिच्या खेळाला आणखी बहार आला. भाऊदेखील बुद्धिबळात दिवसेंदिवस प्रगती करत होता. नंतर तिने बुद्धिबळ प्रशिक्षण बंगळुरूच्या राजा रवी शेखर यांच्याकडे घेतले. तसेच औरंगाबादचे अमरदीप तिवारी हेदेखील अनेक वेळा जळगावला येऊन तिला शिकवत असत. तिने ८ वर्षे आतील गट आणि ९ वर्षे आतील गटाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येदेखील चांगली कामगिरी केली आहे. तिने कमी वयातच वुमेन्स फिडे मास्टर हा किताबदेखील पटकावले आहे. २०१९ च्या सुमारास तिने फिडे रेटिंगमध्ये २००० चा आकडा देखील पार केला होता. मात्र नंतरच्या काळात स्पर्धादेखील फारशा झाल्या नाहीत. त्यामुळे ती आता १९५८ फिडे रेटिंग आहे.
भाग्यश्रीची निवड आता विश्व स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच लवकरच ग्रॅण्डमास्टर आणि वुमेन्स इंटरनॅशनल मास्टर बनण्यासाठी ती जास्तच जोमाने तयारीला लागली आहे.