जळगाव : जळगाव जिल्ह्यात 'लम्पी' या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे जनावरांमध्ये लम्पी रोग सदृश्य लक्षणे दिसताच खासगी पशुवैद्यकीय रूग्णालय व पशुपालकांनी तत्काळ १९६२ या क्रमांकावर तत्काळ कळविणे बंधनकारक आहे. बाधित जनावरांचे उपचार हे पशुधन विकास अधिकारी यांच्या मार्फत किंवा मार्गदर्शनाखाली करावेत. खाजगी पशुवैद्यकीय रूग्णालयांनी परस्पर जनावरांवर उपचार केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.
जनावरांमधील लम्पी आजाराविषयी माहिती देण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद बोलविण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त शामकांत पाटील उपस्थित होते. गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरविणे तसेच प्रदर्शन आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, तसे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात एकूण ३३ बाधित क्षेत्र...जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण ३३ बाधित क्षेत्र आहेत. त्यामध्ये एकूण १ लाख २५ हजार ९८८ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ११ हजार ८०२ लसीकरण पूर्ण झालेले आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये २ लाख २ हजार लससाठा शिल्लक आहे, अशीही माहिती पत्रकार परिषदमध्ये देण्यात आली.
लम्पीमुळे २३ जनावरांचा मृत्यूजळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५६५ जनावरांना लम्पी आजाराची लागण झालेली आहे. त्यापैकी ३६३ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. तर २३ जनावरांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीला १७९ जनावरांवर उपचार सुरू आहे.
जनावरांची वाहतूक बंदजळगाव जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या लगत असलेली मध्यप्रदेश राज्याची सीमा त्यातून होत असलेली जनावरांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. सार्वजनिक चराई कुरण सुद्धा बंद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त शामकांत पाटील यांनी दिली.
गोठा स्वच्छता, गोचिड निर्मुलन मोहीमग्रामपंचायतीच्या मदतीने आणि पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने गोठा स्वच्छता व गोचिड निर्मुलन मोहिम राबविली जाणार आहे. त्याशिवाय लम्पी आजाराने मृत झालेल्या जनावरांचे शास्त्रोक्त पध्दतीने करण्यात यावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत