लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील एका ५६ वर्षीय प्रौढाचा कोरोना झाल्यानंतर पंधरा दिवसांनी मृत्यू झाला. या रुग्णाचे फुफ्फुस निकामी झाले होते. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, कोविडनंतरच्या गुंतागुंत अर्थात पोस्ट कोविडच्या उपचारासाठी जीएमसीत दोन ते तीन रुग्ण दाखल आहे.
जिल्हाभरात कोविडच्या दुसऱ्या लाटेने मोठे थैमान घातले होते. रुग्णांची व मृतांची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढली होती. अशातच पोस्ट कोविडनंतरही काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यात जीएमसीत दाखल दहा ते पंधरा टक्के रुग्णांची फुफ्फुस काही प्रमाणात निकामी झाले होते. मात्र, आता गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या घटल्याने पोस्ट कोविडच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्याही घटल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे.
काय होतो त्रास
बहुतांश रुग्णांना पोस्ट कोविडनंतर दम लागणे, अशक्तपणा येणे या प्रकारच्या त्रासाला अधिक सामोरे लागू शकते. काहींच्या अन्य अवयवांवर परिणाम झाल्याचे आढळते. तर काहींच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झालेली असते.
कोविडचे एकूण रुग्ण
१,४२,६७८
बरे झालेले रुग्ण १,४०,०७५
मृत्यू २,५७५
जीएमसीत दाखल ०३
पोस्ट कोविड उपचारार्थ दाखल : ०२
पोस्ट कोविडमुळे महिनाभरात मृत्यू :०१
पोस्ट कोविडनंतर अनेकांच्या फुफ्फुसांवर परिणाम होत असतो. त्यामुळे अशा रुग्णांना दम लागणे व अशक्तपणाचा त्रास जाणवतो. अनेकांची फुफ्फुसे यात निकामी होतात. - डॉ. विजय गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, मेडिसिन