जळगाव : मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाच्या वारंटमध्ये फरार असलेला क्रिष्णकुमार लालबहादूर पटेल (रा.दिहुली, जि.सिंदी, मध्य प्रदेश) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दुपारी साकेगाव, ता.भुसावळ येथून ताब्यात घेतले. क्रिष्णकुमार हा मध्य प्रदेश पोलिसांसाठी मोस्ट वॉँटेड होता. तो मिळून येत नसल्याने जबलपूर खंडपीठाने त्याच्याविरुध्द अजामीनपात्र वारंट बजावले होते.दरम्यान, जबलपुर पोलीस त्याचा शोध घेत असताना क्रिष्णकुमार हा जळगाव जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यावरुन सिंधी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क साधून आरोपीचा फोटो, वर्णन व गुन्ह्याचे स्वरुप सांगितले होते. त्यानुसार डॉ.उगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांना पथक तयार करुन संशयिताच्या शोधासाठी रवाना करण्याचे आदेश दिले होते. सहायक निरीक्षक महेश जानकर, सहायक फौजदार मुरलीधर आमोदकर, विनोद पाटील, अनिल देशमुख, रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, अशोक पाटील यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून क्रिष्णकुमारला ताब्यात घेतले. मध्यप्रदेश पोलीस त्याला घेण्यासाठी रवाना झाले आहेत.जेसीबी चालकक्रिष्णकुमार हा साकेगाव येथे महामार्गाच्या कामावर जेसीबीवर चालक म्हणून काम करीत होता. अनेक दिवसापासून गुजरातमध्ये होता. तेथून २५ एप्रिल रोजी तो साकेगाव येथे आला. तेव्हापासून तो चालक म्हणून काम करीत होता.त्याला जिल्हा पेठ पोलिसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.
मध्यप्रदेशातील आरोपीला साकेगावात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 12:53 PM