जळगाव : शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेत आतापर्यंत २२५१ शेततळी बांधण्यात आली असून त्याच्या ९९ टक्के अनुदानाचे वाटप देखील झाले आहे. आता फक्त १५ जणांना त्याचे अनुदान देणे बाकी असल्याची माहिती जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली.
राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे ही योजना कार्यान्वीत होती. आता ही योजना बंद झाली आहे. मात्र या योजनेत जिल्ह्यात २२५१ शेततळी आहेत. तर एमआयडीएसची सामुहिक शेततळ्यांची योजना अजून बंद आहे. या योजनेला अजून सुरूवात झालेली नाही.
गेल्या काही काळापासून जिल्हाभरात शेततळ्यांची चांगलीच मागणी वाढत आहे. वेळेवर न होणारा पाऊस या मुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांवर संकट ओढावते. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा ओढा आता स्वत:च्या शेतात तळी बांधण्याकडे आहे. त्यातूनच मागेल त्याला शेततळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अजून सामुहिक शेततळ्यांच्या योजनेला सुरूवात होऊ शकलेली नाही.