जळगाव/रावेर : जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार विजयी झाल्याने पाच वर्षांनंतरही भाजपची विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम राहीली असल्याचे स्पष्ट झाले. रावेरमधून खासदार रक्षा खडसे या पुन्हा विजयी झाल्या असून जळगाव मधून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील हे विजयी झाले आहेत. रावेरमध्ये रक्षा खडसे यांचे सासरे व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची मतदार संघावर पकड कायम असल्याचे तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची जादू जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात चालल्याचेही स्पष्ट झाले.जळगाव मतदार संघात वास्तविक सुरूवातील भाजपच्या उमेदवारीचा घोळ झाला. मात्र त्यावरही मात करीत संघटीतपणे प्रचार केल्याने प्रचंड आघाडी घेण्यात भाजपला यश आले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीच याबाबत सूत्र सांभाळली.राष्टÑवादीने जळगाव मतदार संघात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना तर काँग्रेसने रावेरमधून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली. देवकर हे भाजप उमेदवाराला अटीतटीची लढत देतील, असे संकेत होते. कारण देवकर व उन्मेष पाटील हे दोन्ही उमेदवार चाळीसगाव तालुक्यातीलच होते. मात्र पहिल्या फेरीपासूनच भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांनी आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत देवकरांना तोडता आली नाही. रावेरमध्येही रक्षा खडसे यांनी डॉ.उल्हास पाटील यांच्यावर सुरूवातीपासूनच आघाडी घेतली. ती शेवटपर्यंत कायम राखली.महाजन यांनी जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका, तसेच जळगाव मनपा निवडणूक, जामनेर पालिका व शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत पक्षाला एकतर्फी विजय मिळवून दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. आता लोकसभेतही विजय मिळाल्याने जल्लोष होत आहे.
जळगावात भाजपाची जादू पाच वर्षात कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:22 PM