जळगाव महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर आता भाजपचे बंडखोर व निष्ठावान नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. बंडखोर भाजपच्या नगरसेवकांना कौरवांची उपमा देत आहेत. तर भाजपचे नगरसेवक बंडखोरांना कौरव म्हणत आहेत. दोघांमध्ये महापालिकेच्या कुरुक्षेत्रावर महाभारत सुरु असले तरी हस्तीनापूर असलेल्या जळगावशी एकनिष्ठ असलेल्या विदुराची कमतरता या महाभारतात दिसून येत आहे. कारण, भांडणारे नगरसेवक केवळ सत्तेसाठीच भांडत असून, जळगावच्या विकासचा मुद्दा पुढे करत आहेत. मात्र, कौरव-पांडव कधीही सत्तेसाठी युती-आघाडी करायला तयार नव्हते. मात्र, जळगाव शहरातील हे कौरव पांडव आपल्या सोईनुसार युती-आघाडी करून सत्ता उपभोगतात आणि जनतेसमोर महाभारताचा खेळ रचतात. आता महाभारताचा खेळ जळगावकरांनाही माहिती पडल्याने, आगामी कुरुक्षेत्रात या पांडव-कौरवांना जळगावची (हस्तीनापुर) जनताच उत्तर देणार आहे.
अजय पाटील