-विलास बारीमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकारण हे ढवळून निघाले आहे. खडसे यांच्या पक्षांतरानंतर भाजपनेदेखील पक्षाची नव्याने बांधणी करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. खडसे यांच्या पक्षांतरानंतर कोणत्या तालुक्यात भाजपला फटका बसणार यासाठी तालुकानिहाय बैठका सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी थेट खडसे यांच्या पक्षांतराचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगत उलट पक्षाची स्थिती खान्देशात बळकट होईल, असे सांगत आक्रमक भूमिका घेतली आहे. याच बरोबर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत फोटो काढून भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे चित्र खडसे निर्माण करीत असल्याचा आरोप केला आहे.
भाजप हा व्यक्ती केंद्रीत पक्ष नसल्याचे सांगत कुणाच्या जाण्याने फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. खासदार उन्मेष पाटील यांनी सुरुवातीला महापालिकेत बैठक घेतली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सीईओ यांची भेट घेत योजनांचा आढावा घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणची चाचपणी सुरू झाली आहे. तिकडे भाजप कार्यालयातून खडसे व त्यांचे पुत्र स्व.निखिल खडसे यांचे छायाचित्र काढण्यावरून वादंग निर्माण झाले. नाथ फाउंडेशनने त्यावर आक्षेप घेतल्यानंतर भाजपने पुन्हा निखिल खडसे यांचे छायाचित्र कार्यालयात लावले आहे. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आणि प्रवेश केल्यानंतर काही दिवस एकनाथ खडसे हे आक्रमक भूमिकेत होते. मात्र काही दिवसांपासून ते संयमी भूमिकेत आहेत. शुक्रवारी आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या कॉंग्रेस भवनातील सत्कार कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विरोधाचा सूर लावला. दुसरीकडे राष्ट्रवादीमध्येदेखील जुन्या पदाधिकाऱ्यांनी खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शविला नसला तरी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयातील सत्काराकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे आता भाजपमध्ये गिरीश महाजन यांचे नेतृत्व आणि राष्ट्रवादीमधील अंतर्गत विरोध या स्थितीत दोघा नेत्यांची कसोटी लागणार आहे.