लोकमत ऑनलाईन खडकदेवळा, ता. पाचोरा, दि.25 : तालुक्यातील नांद्रा येथील दुर्गा मित्र मंडळाच्या तरुण कार्यकत्र्यानी कोल्हापूर ते नांद्रा हे सहाशे कि.मी. एवढे मोठे अंतर अवघ्या चार दिवसात पायी कापून महालक्ष्मीची अखंड ज्योत आणली. नवरात्रोत्सवानिमित्त नांद्रा, ता. पाचोरा येथील महालक्ष्मी दुर्गा मित्र मंडळाच्या कार्यकत्र्यानी कोल्हापूर येथून अखंड ज्योत आणण्याचे ठरविले. 17 सप्टेंबर रोजी सकाळी देवीची आरती करून कोल्हापूर येथून हे तरुण ज्योत घेऊन निघाले. त्यांचा पहिला मुक्काम विरबाबा मंदिर फलटणजवळ झाला. दुसरा मुक्काम चिखली (अहमदनगर), तिसरा मुक्काम टापरगाव जनार्दन महाराज आश्रम (कन्नड) येथे, तर चौथा मुक्काम नाथ मंदिर जारगाव, पाचोरा येथे झाला. 21 रोजी सकाळी 7 वाजता नांद्रा गावात ही ज्योत दाखल झाली. प्रथम गावातील ज्येष्ठ नागरिक साहेबराव पाटील व आप्पासाहेब सीताराम पाटील यांनी महादेव मंदिरावर मंडळाच्या तरुणांचे स्वागत केले. ज्योत घेण्यासाठी 30 तरुण रवाना झाले होते. त्यांना विनोद बाविस्कर व बापू सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. मंडळाचे हे 19 वे वर्ष आहे. महाराष्टातून ठिकठिकाणाहून मागील चार वर्षापासून हे मंडळ अखंड ज्योत आणत आहे. 2014 मध्ये जोगेश्वरी, 2015 मनुदेवी, 2016 मध्ये माहूरगड, तर यंदा कोल्हापूरच्या महालक्ष्मीची ज्योत आणली. भविष्यात या तरुणांनी पावागड (गुजरात) व वैष्णोदेवी (जम्मू) येथून अखंड ज्योत आणण्याचा संकल्प केला आहे. या पदयात्रेत गणेश कर्नावट, डिगंबर सूर्यवंशी, बाळा पारस, राजेंद्र पाटील, योगेश बोरसे, बाळू सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, भूषण तावडे, बापू वाघ, विश्वास पाटील, सागर तावडे, बारकू बाविस्कर, एकनाथ बोरसे, प्रमोद सूर्यवंशी आदी तरुणांनी ज्योत आणण्यासाठी सेवा दिली. तर प्रदीप बाविस्कर व किशोर सूर्यवंशी यांनी कोल्हापूर व सांगली येथे भोजन व्यवस्था केली.
चार दिवसात सहाशे कि.मी.अंतर पायी कापून आणली कोल्हापूरहून महालक्ष्मीची ज्योत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 6:32 PM
पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील तरुणांनी रात्रंदिवस प्रवास करीत ही ज्योत आणली असून पुढील ज्योत पावागड आणि वैष्णोदेवी येथून आणणार असल्याचा निश्चय केला आहे.
ठळक मुद्देतरुणांनी वाटेत केला केवळ तीन ठिकाणी मुक्काम30 तरुणांच्या जत्थ्याला लाभले सहकार्याचे बळ