गैरसोय : पावसामुळे दुसऱ्या दिवशीही मुंबईकडून येणाऱ्या गाड्या रखडल्या
जळगाव : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्या विलंबाने धावल्या. तर सोमवारी पुन्हा पावसामुळे मुंबईकडून येणाऱ्या महानगरी ७ तास, गीतांजली ३ तास, काशी ३ या महत्त्वाच्या गाड्या विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या दोन दिवसांच्या मेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द आणि सुरू असलेल्या गाड्याही विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. त्यानंतर आता पुन्हा पावसामुळे रेल्वे प्रशासनातर्फे गाड्या विलंबाने सोडण्यात येत असल्याने प्रवाशांना सोमवारी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाने पावसाचे कारणाने रविवारी रात्री मुंबईतून सुटणाऱ्या अनेक गाड्या सोमवारी सकाळी सोडल्या. परिणामी या सर्व गाड्या आपल्या निर्धारित वेळेनुसार विलंबाने धावत आहेत. या मध्ये प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद असलेली महानगरी एक्स्प्रेस तब्बल सात तास विलंबाने धावत होती. तसेच गीतांजली एक्स्प्रेस तीन तास, काशी एक्स्प्रेस तीन तास, गोरखपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस तीन तास व पाटलीपुत्र एक्स्प्रेस सहा तास विलंबाने धावली. दरम्यान, जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या मात्र वेळेवर धावल्या.
इन्फो :
गाडीच्या प्रतीक्षेत प्रवासी ताटकळले
गेल्या दोन दिवसांपासून गाड्या विलंबाने धावत असल्याने, याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारी मुंबईकडून येणाऱ्या गाड्या विलंबाने धावत असल्यामुळे प्रवाशांना स्टेशनवरच गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागले. यामुळे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरम्यान, पावसामुळे या गाड्या मुंबईतून न सोडता, या पुढे नाशिकहून सोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.