जळगाव : यंदाच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच ही निवडणूक लढविली जात आहे. यंदा जिल्ह्याच्या कोणत्याही मतदारसंघात महायुतीतून बंडखोरी होणार नाही. पाचोऱ्यात अमोल शिंदे, पारोळ्यात ए. टी. पाटील असतील त्यांना आम्ही विनंती करणार आहोत. त्यांना असे करता येणार नाही, म्हणून ताकीदही देण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली आहे.
गुरुवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज धरणगाव येथे भरला. यावेळी पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. गिरीश महाजन यांनी सांगितल की, पारोळा असो वा पाचोरा, या दोन्ही मतदारसंघांसह अन्य मतदारसंघांतही भाजपकडून कोणतीही बंडखोरी होऊ देणार नाहीत. अमोल शिंदे व ए. टी. पाटील यांना समजावण्यात आले आहे. तरी गरज पडली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील त्यांच्याशी बोलणार असल्याचेही गिरीश महाजन म्हणाले.
तो निर्णय महाविकास आघाडीचा
• महाविकास आघाडीकडून उमेदवारही जाहीर होत नाहीत, शेवटी त्यांचे उमेदवार जाहीर करायचे की नाही..? हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, त्यांना उमेदवारच मिळत नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
• जामनेरला उमेदवारच नसल्याने आमच्यातलाच एक घेऊन त्याला उमेदवारी दिली. त्यांना कोणाला उभे करावे हेच समजत नसल्याने, शेवटपर्यंत त्यांची कसरत सुरूच राहील, असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला.
उत्तर महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वाधिक जागा येतील
• जळगाव जिल्ह्यात गेल्या वेळी एखाद-दुसरी जागा आमची गेली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील.
• तसेच उत्तर महाराष्ट्रातही सर्वाधिक महायुतीच्याच जागा येतील, असाही विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.