मोहन सारस्वत
जामनेर : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन विजयी षटकारानंतर यंदा सातव्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. गेल्या ३० वर्षांत केलेल्या कामांच्या बळावर ते मते मागत आहेत, तर या विकासकामांवर प्रश्न उपस्थित करत विरोधक त्यालाच प्रचाराचा मुद्दा बनवत आहेत.
महाजन यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप खोडपे यांच्याशी आहे. ते पूर्वाश्रमीचे भाजपचे असल्याने महाजन यांच्या स्वकियांशी होत असलेल्या लढतीकडे लक्ष लागले आहे. महाजन भाजपचे स्टार प्रचारक असून, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविली असल्याने त्यांना इतर मतदारसंघात प्रचाराला जावे लागत आहे.
जामनेरमध्ये महाजन यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्या अर्धांगिनीसह पदाधिकारी यांनी स्वीकारली आहे. महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर आहे. त्यांनी प्रचाराच्या दोन फेऱ्या पर्ण केल्या आहेत. खोडपे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पक्षाचे नेते शरद पवार, आमदार एकनाथ खडसे यांच्या सभा तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा रोड शो झाला. महाजन यांनी मतदारसंघात एकही सभा घेतली नाही. मी केलेल्या कामाच्या बळावर मतदार मला संधी देतील, असा त्यांना विश्वास आहे.
प्रचारात बेरोजगारी, कापूस दराचे मुद्दे
गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून टेक्सटाईल पार्क उभारला जाणार आहे. कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग संपर्कात असल्याचे ते सांगतात. शेतीसाठी सिंचनाची सुविधा पुरविल्याने तालुक्यात हरितक्रांती झाली आहे. तर कापसाला भाव मिळत नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला आहे. मतदारसंघासाठी गेल्या दहा वर्षात आपण सुमारे साडेसहा हजार कोटींची कामे केल्याचा दावा महाजन यांचा आहे तर विरोधक त्यांचा हा विकासाचा मुद्दा मानायला तयार नाही.
निवडणूक कार्यालयच वॉररूम
भाजप व राष्ट्रवादी पक्षाची प्रचार कार्यालये हीच वॉररूम झाली असून, येथूनच निवडणुकीची सूत्रे हलविली जात आहेत. भाजपचे प्रचार कार्यालय बजरंगपुरा येथे तर राष्ट्रवादीचे प्रचार कार्यालय बोदवड चौफुलीवर आहे.
लाडक्या बहिणींना सुरक्षा मिळणे अपेक्षित आहे. महिलांसाठी अत्याधुनिक जीमची उभारणी होणे गरजेचे आहे. तरुणींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देतांनाच तीला रोजगार देखील मिळायला हवा. - स्वाती उदार
जामनेर मतदार संघातील मुलभूत समस्या सोडवण्याची जबाबदारी लोकप्रतिनीधींची आहे. त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिला पाहिजे.- आसीफ शेख रशीद, जामनेर