बी.एस. चौधरी
एरंडोल : जुन्या काळातील काँग्रेसच्या मातब्बर नेत्या पारूताई वाघ यांच्या नावावर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने एक भला मोठा विक्रम आहे. एकाच मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडणूक लढलेल्या त्या खान्देशातील एकमेव महिला उमेदवार आहेत. बहुतेक राज्यातही त्यांच्या या विक्रमाची बरोबरी करणारे कुणी नसावे. विशेष म्हणजे या पाचही निवडणुका त्या काँग्रेस पक्षाकडून लढल्या.
१९७८,१९८०,१९८५,१९९०,१९९५ अशा ५ वेळा पारूताई वाघ यांना काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यापैकी दोन वेळा मतदारांनी त्यांना विधानसभेत पाठवले. तर तीन वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. वाघ यांना वेळोवेळी त्यांच्या राजकीय विरोधकांनी कडवा विरोध करून देखील लढाऊ वृत्तीमुळे एकदा नव्हे तर दोनदा त्यांना एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
पारूताई वाघ यांनी १९८० व १९८५ अशा सलग दोन विधानसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. एरंडोल मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या अजुनही त्या एकमेव महिला उमेदवार आहेत. त्यांचा अपवाद वगळता आतापर्यंत एरंडोल मतदारसंघावर पुरूष उमेदवारांचे वर्चस्व राहिले आहे.
पारूताईंनी १९७८ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत अर्ज भरला. पण या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी झालेल्या निवडणुकीत त्यांनी विजयश्री खेचून आणली. सन १९८० च्या विधानसभा निवडणुकीत वाघ यांना २४ हजार १११ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी जनता पक्षाचे उमेदवार विजय धनाजी पाटील यांना १७ हजार ९५० मते मिळाली. ६ हजार १६१ मतांनी वाघ विजय मिळवला. यानंतर सन १९८५ च्या विधानसभा निवडणूकीत वाघ यांना २७ हजार ८०४ मते मिळवून विजय मिळवला तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार ॲड.एन. बी. पाटील यांना २२ हजार ८४६ मते मिळाली. यावेळी वाघ यांना ४ हजार ९५८ मतांची आघाडी मिळाली.
सलग पाचवेळा एकाच मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या त्या विशेष महिला उमेदवार ठरल्या आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीसुध्दा सलग पाच वेळा विधानसभेची निवडणूक लढली पण पारूताईंप्रमाणे त्यांचा मतदारसंघ एकच नव्हता तर एकदा जळगावमधून आणि नंतर चार वेळा त्यांनी त्यावेळच्या एदलाबाद (मुक्ताईनगर) मतदारसंघातून निवडणूक लढली होती.
काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखविला. त्यामुळे सलग पाचवेळा निवडणूक लढवता आली.- पारुताई वाघ