जळगाव : सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील आंबापाणी ता. यावल या चोपडा मतदारसंघातील मतदान केंद्राला केंद्रीय निवडणूक निरीक्षक अरुणकुमार यांनी बुधवारी भेट दिली. विशेष म्हणजे या निरीक्षकांनी हरीपुरा ते आंबापाणी जाण्याचा आणि येण्याचा २० किलोमीटरपर्यंतचा प्रवास पायीच केला.
चोपडा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक अरुणकुमार हे बुधवारी सकाळी ८ वाजता हरिपुऱ्यात दाखल झाले. हरिपुऱ्याहून आंबापाणीपर्यंत दहा किलोमीटर अंतर. तिथे दुचाकीशिवाय प्रवास अशक्यच. म्हणून निरीक्षकांसाठी स्थानिक प्रशासनाने दोन दुचाकी मदतीसाठी ठेवल्या. मात्र अरुणकुमार यांनी पायीच प्रवास करण्याला पसंती दिली. त्यामुळे यावल तहसील प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा त्यांच्यासोबत रवाना झाला.
दुपारी १२ वाजता अरुणकुमार हे आंबापाणीत पोहोचले. त्यानंतर त्यांनी तिथल्या झोपडीत असलेल्या मतदान केंद्राची पाहणी केली. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर मतदारांशी चर्चा केली. दुपारी २ वाजेनंतर त्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. सायंकाळी साडेपाच वाजता ते हरिपुऱ्यात दाखल झाले. त्यानंतर कारने ते चोपड्याकडे रवाना झाले.
निरीक्षकांना बसला धक्का
या भेटीदरम्यान आंबापाणी मतदान केंद्राचा प्रवास पाहून निरीक्षक अरुणकुमार यांना धक्काच बसला. सातपुड्यातील दुर्गम भागात असणाऱ्या या मतदान केंद्रावर ३५४ मतदार आहेत. या मतदारांचा सुरू असलेला वर्षानुवर्षापासूनचा प्रवास पाहून तेही थक्क झाले.