जळगाव : महाविकास आघाडीकडून जिल्ह्यातील ११ मतदारसंघाच्या जागावाटपासह उमेदवारांच्या नावांबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, उद्धव सेनेकडून पाचोरा मतदारसंघात वैशाली सूर्यवंशी, तर चाळीसगाव मतदारसंघात उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म देण्यात आल्याची माहिती उद्धव सेनेच्या विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. उन्मेश पाटील यांनी या वृत्तास दुजोरा दिला.
उद्धव सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी सोमवारपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यात उद्धव सेनेकडून जिल्ह्यातील पाचोरा व चाळीसगाव या दोनच जागांवरील उमेदवारांना ए.बी. फॉर्म दिले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट, व्हिडीओ व्हायरल करून बंडाची तयारी...
• भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता भाजपकडून इच्छुक असलेल्या अनेक इच्छुकांनी बंडाचा झेंडा हातात घेण्याची तयारी केली आहे. याबाबत भाजप पदाधिकारी व नेत्यांबाबतच्या काही पोस्ट समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. त्यात माजी खासदार ए. टी. पाटील यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात मी पुन्हा जनतेच्या सेवेसाठी तत्पर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
• तर दुसरीकडे जळगाव शहरातून माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्याबाबतची 'मी लढणारच अशी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर पाचोरा मतदारसंघातून भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचीही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
• त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत बंडाचे झेंडे घेणाऱ्यांची मनधरणी करण्याचे आव्हान भाजप नेत्यांसमोर राहणार आहे.
एका जागेचा तिढा सुटल्यानंतर, उभा राहतोय दुसऱ्या जागेचा तिढा
• महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जळगाव जिल्ह्यातील ११ जागांबाबत सुरुवातीपासूनच रस्सीखेच सुरु आहे.
• उद्धव सेना, शरद पवार गट व काँग्रेसकडून काही ठराविक जागांवरील आग्रह कायम आहे. त्यामुळे जागावाटपाचा कोणताही निर्णय होत नाही.
पक्षाकडून चाळीसगाव मतदारसंघात उन्मेष पाटील यांना, तर पाचोऱ्यातून वैशाली सूर्यवंशी यांना ए.बी. फॉर्म देण्यात आला आहे. इतर जागांबाबतदेखील बुधवारी सायंकाळपर्यंत अधिकृत घोषणा होईल. काही जागांवर पेच सुरूच आहे. - विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना