जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार मागणी करूनही नोकरभरती होत नसल्याने त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बँकेच्या सर्व कर्मचारी संघटनांनी २७ सप्टेंबर रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. यामुळे जिल्हाभरातील महाराष्ट्र बँकेच्या ४० शाखा सोमवारी बंद राहणार असून, याचा ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.
यासंदर्भात कर्मचारी संघटनांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांचा मृत्यू, निवृत्ती, राजीनामे, पदोन्नती यामुळे अनेक जागा रिक्त झालेल्या आहेत. मात्र, त्या भरल्या जात नाहीत. शिवाय बँकेमार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यातून कामाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना आजारपण असो की, इतर कारणांसाठी रजादेखील मिळत नाही. त्यामुळे कर्मचारी तणावाखाली असून, त्याचा ग्राहक सेवेवरदेखील विपरीत परिणाम होत आहे. शिवाय बँकांचा व्यवसायदेखील वाढत नसल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्याचा उपयोग होत नसल्याने २७ रोजी संप पुकारण्यात येत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. या संपामध्ये ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना, महाबँक नवनिर्माण सेना या महाराष्ट्र बँकेतील सर्व संघटना संपात सहभागी झाल्या आहेत.