लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ऑक्सिजन पुरवठ्याची आणीबाणी सर्वत्र असून, शनिवारी जळगावातही बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. प्लांटमधून टँकर लवकर भरले न गेल्याने त्यांना उशीर झाल्याने यंत्रणेची झोप उडाली होती. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धुळे येथून टँकर आल्याने रात्र निघाली व रविवारी नियमित टँकर आल्याने यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला. खासगी रुग्णालयांमध्येही अशीच स्थिती होती.
खासगी रुग्णालयांना तर बॅकअप नसेल तर ऑक्सिजन लागत असणारे रुग्ण दाखल करू नये इथपर्यंत प्रशासनाने शनिवारी निर्देश दिल्याची माहिती आहे. मात्र, रविवारी नियमित टँकरचा पुरवठा आल्याने स्थिती नियंत्रणात आली. सध्या ऑक्सिजनची मागणी अधिक व पुरवठा अगदी तेवढाच होत असल्याने २४ तासांनंतर आणीबाणीची स्थिती निर्माण होत आहे. दोन दिवसांपूर्वीच मुक्ताईनगर व न्हावी येथील रुग्ण हलविण्यात आले हेाते. मात्र, शनिवारी तर नियमित टँकर वेळेवर न पाेहोचल्याने यंत्रणेसमोरील ताण वाढला होता. अखेर नाशिक व धुळे, औरंगाबाद अशा ठिकाणांहून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियमित टँकरला उशीर होत असल्याने तणाव वाढला होता. मात्र, रात्री ११ वाजता धुळे येथील टँकर आले व त्यातून ४ टन लिक्विड या टँकमध्ये भरण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी टँकर आल्यानंतर साडेपंधरा टन लिक्विड टँकमध्ये भरण्यात आले.
प्रशासनाने काढली रात्र जागून
ज्या ठिकाणाहून जिल्ह्यासाठी टँकर भरले जातात, त्या ठिकाणी प्रेशरच्या अडचणी निर्माण झाल्यामुळे टँकर लवकर भरले जात नव्हते. त्यामुळे उशीर झाला. मग हा कालावधी भरून कसा काढणार, असा प्रश्न प्रशासनासमोर होता. याचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, औषध निरीक्षक डॉ. अनिल माणिकराव हे सकाळी चार वाजेपर्यंत या टँकरचा पाठपुरावा करीत होते.
---------कोट----
प्लाँटमध्ये टँकर लवकर भरले जात नसल्याने टँकरला उशीर झाला. मग तो कालावधी भरून काढण्यासाठी नाशिक, धुळे येथून टँकर मागविण्यात आले. रविवारी सकाळी नियमित टँकर आले. - डॉ. अनिल माणिकराव, औषध निरीक्षक
आठ तासांत माहिती द्या
खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडील ऑक्सिजनच्या मागणीबाबत आठ तास आधीच प्रशासनाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, जीएमसी येथून दर तीन तासांनी रीडिंग घेऊन प्रशासनाला कळविले जाते.