जळगाव - दसऱ्याच्या दिवशी आपण शस्त्राची पूजा करतो आणि या शस्त्राच्या माध्यमातून दृष्ट शक्तीचा नायनाट करतो, राज्यात सत्तेत भाजप शिवसेना युतीची घातक राजकीय शक्ती आहे, या शक्तीचे दसऱ्याच्या मुहूर्तावर निर्मूलन करा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
पारोळा येथे किसान महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार डॉ सतीश पाटील यांच्या प्रचारासाठी मंगळवारी सायंकाळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अरुणभाई गुजराथी आदी उपस्थित होते
शरद पवार म्हणाले की, कांद्याच्या भाव वाढीमुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले होते. पण केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली. शेतकऱ्यांने कांदा चाळीत किती आणि घरात किती कांदा किती ठेवावा, याबाबत अट घातली. या मुळे कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कांद्याचे भाव वाढलेत की सरकार हवालदिल होते पण शेतकरी आत्महत्या होते तेव्हा शासनकर्ते हवालदिल का होत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला
मोठे उद्योजक कर्ज थकवितात तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी हे सरकार स्वतःच्या तिजोरीतून ते पैसे भरते. पण सामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसा नसतो म्हणून या शेतकरी, युवक, नोकरदारांच्या विरोधातील या सरकारला घरी पाठवा असे आवाहन त्यांनी केले.