जळगाव - जम्मू काश्मीरमधील लोकांच्या विरुद्ध भावना काँग्रेस-राष्ट्रवादीची दिसून येते. शेजारील राष्ट्रांना मदत होईल असे वक्तव्य करतात. त्यामुळे तुमच्यात हिंमत असेल तर आगामी निवडणुकीत विरोधकांनी जम्मू काश्मीरमधून कलम 370 परत आणू असं घोषणापत्रात देणार का? उगाच खोटे अश्रू काढू नका असं आव्हान नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जळगावात अभूतपूर्व सभा झाली. पुढील 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार यावं यासाठी मी जळगावात आलो आहे. तुम्ही जो विश्वास भाजपावर, एनडीएवर दाखविला त्याचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे. चार महिन्यांपूर्वी तुम्ही समर्थ, सशक्त भारताच्या निर्माणासाठी मतदान केलं होतं. जगात भारताला स्थान मिळावं यासाठी तुम्ही मतदान केलं. नव्या भारताचा नवा जोश जगाला दिसू लागला आहे. तुम्हाला हे दिसतंय ना,असं जनतेला विचारले. पूर्वी असं चित्र पाहायला मिळालं होतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित लोकांना विचारला. केवळ मोदी मूळे हे होत नाही, १३० कोटी भारतीय जनतेने केलेल्या सहकार्य यामुळे शक्य झाले.
तसेच माता, भगिनींनी आवाहन आहे, तुम्ही लोकसभेत पुरुषांच्या बरोबरीने मतदान केले. आता महाराष्ट्रात पुरुषापेक्षा अधिक मतदान महिलांनी करावे. जाती, भेदभाव, भाषा यातून बाहेर निघत भाजपाला मतदान दिलं. त्यामुळे भारताची ताकद जगाला दिसत आहे. भारतीय जनतेच्या समर्पण, योगदान, उत्साह यामुळे जगात भारताची मान उंचावली आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, 5 ऑगस्टला देशात काय झालं? 70 वर्ष जम्मू काश्मीर आणि लडाख विकासापासून वंचित केलं होतं. जम्मू काश्मीर आमच्यासाठी फक्त जमीन नाही तर भारतमातेचं मस्तक आहे. 70 वर्षानंतर काश्मीरी लोकांना स्वातंत्र्य मिळालं. जम्मू काश्मीरमध्ये जनजीवन पूर्ववत करण्यासाठी या सरकारने प्रयत्न केले. 4 महिन्यात काश्मीर लोकांचे जनजीवन सामान्य झालं. मात्र या निर्णयावरही काही राजकीय पक्ष राजकारण दुदैव करत आहेत. यात महाराष्ट्रातील पक्षही सहभागी आहे.
गेली 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांनी स्थिर सरकार दिलं. इतक्या वर्षांमध्ये फक्त एकाच मुख्यमंत्र्यांना सलग 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहता आलं. त्यानंतर दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला, महाराष्ट्रात 5 वर्ष भ्रष्टाचार दिसला नाही, रस्त्यांपासून सिंचनापर्यंत, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, शेतकऱ्यांपासून कामगारांपर्यंत सगळ्यांना न्याय दिला असं सांगत नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले